बिहारची राजधानी पाटणा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका बँकेमध्ये घुसलेल्या दरोडेखोराने बंदुकीचा धाक दाखवत तिथे पैसे भरण्यासाठी आलेल्या एका ज्वेलर्सच्या कर्मचाऱ्यांना धमकावून त्यांच्याकडील पैसे हिसकावण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान झालेल्या झटापटीत बंदुकीतून गोळीही सुटली. मात्र कर्मचाऱ्यांनी या हत्यारबंद दरोडेखोराचा अगदी धैर्याने सामना केला आणि त्याच्याकडील बंदूक हिसकावून घेतली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार पाटणा येथील बोरिंग रोडवर स्थित असलेल्या बँक ऑफ बडोदाच्या एस.के. पूरी शाखेमध्ये सकाळी ११ वाजून ५५ मिनिटांच्या सुमारास कल्याण ज्वेलर्सचे दोन कर्मचारी पैसे जमा करण्यासाठी आले होते. जेव्हा ते बँकेच्या पायऱ्यांवर पोहोचले तेव्हा एका दरोडेखोराने त्यांच्या हातातील पैशांनी भरलेला बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुले बँकेच्या परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं.
मात्र या कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवून या दरोडेखोराचा सामना केला. यादरम्यान झालेल्या झटापटीत गोळीही चालली. मात्र सुदैवाने ही गोळी जाऊन भिंतीला लागली. त्यानंतरही या कर्मचाऱ्यांना न घाबरता दरोडेखोराकडील बंदूक हिसकावून घेतली. त्यानंतर दरोडेखोराने तिथून पळ काढला. ही घटना पाटण्यामधील उच्चभ्रू परिसरात घडल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.