शिवसेनेच्या मुखपत्रावर बंदी घाला -काँग्रेस
By Admin | Updated: April 22, 2015 01:13 IST2015-04-22T01:13:19+5:302015-04-22T01:13:19+5:30
काँग्रेस पक्षाने आज लोकसभेत शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’ बंद करून त्याच्या संपादकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

शिवसेनेच्या मुखपत्रावर बंदी घाला -काँग्रेस
शीलेश शर्मा, नवी दिल्ली
काँग्रेस पक्षाने आज लोकसभेत शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’ बंद करून त्याच्या संपादकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. ‘सामना’तून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप काँग्रेसचे सभागृह नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी लोकसभेत केला आहे.
संजय राऊत यांचे नाव न घेता खरगे यांनी त्यांच्या ‘सामना’तील वादग्रस्त वक्तव्याचा तीव्र निषेध केला. सामनात मुस्लिमांना मताधिकारापासून वंचित ठेवण्याबाबत विधान करण्यात आले होते.
यावर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले की, देशाची राज्यघटना सर्वांना समान हक्क देते. राज्यघटना कुणालाही जाती, धर्म, रंग, वंश यांच्या आधारावर भेदभाव करण्याची परवानगी देत नाही. संसदेत आणि बाहेर कुणीही जाती, धर्म, रंग, वंश यांच्या आधारे भेदभावपूर्ण विधान करत असेल तर त्यास सरकारचे पाठबळ नसेल, असेही गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.
तत्पूर्वी, शून्य प्रहरादरम्यान काँग्रेसचे एम. आय. शाहनवाज यांनी हा मुद्दा उपस्थित केला.