शाळेत लैंगिक शिक्षणावर बंदी घाला - डॉ. हर्षवर्धन
By Admin | Updated: June 27, 2014 13:51 IST2014-06-27T11:40:15+5:302014-06-27T13:51:56+5:30
शाळेतील लैंगिक शिक्षणावर बंदी घालावी असे मत मांडत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आता एका नव्या वादाला तोंड फोडले आहे.
शाळेत लैंगिक शिक्षणावर बंदी घाला - डॉ. हर्षवर्धन
>ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २७ - 'शाळेतील लैंगिक शिक्षणावर बंदी घालण्यात यावी' असे मत मांडत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. स्वत: डॉक्टर असलेल्या हर्षवर्धन यांनी दिल्लीतील शाळांसाठी 'व्हिजन डॉक्यूमेंट' (भविष्यकालीन आराखडा) प्रसिद्ध केला असून त्यात त्यांनी हे मत मांडले आहे. 'शाळेत दिल्या जाणा-या या तथाकथित लैंगिक शिक्षणावर बंदी घालण्यात यावी आणि शालेय अभ्यासक्रमात भारतीय संस्कृतीशी संबधित मूल्यांचा व संस्कारांचा समावेश करून त्याचे शिक्षण द्यावे,' असे हर्षवर्धन यांनी म्हटले आहे. मात्र हर्षवर्धन यांचे हे मत वैयक्तिक असल्याचे त्यांच्या मंत्रालयाने म्हटले आहे. हर्षवर्धन सध्या अमेरिकेत असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.
दरम्यान लैंगिक शिक्षणावर बंदी घालण्यासंदर्भातील विषय हा पक्षाच्या कार्यक्रमपत्रिकेत नसून, त्यावर कोणतीही चर्चा झालेली नाही. त्यामुळे या विषयावर कोणतीही प्रतिक्रिया देणे योग्य ठरणार नाही, असे दिल्ली भाजपचे प्रवक्ते संजय कौल यांनी सांगितले.
यापूर्वीही हर्षवर्धन यांनी एक वादग्रस्त विधान केले होते. 'एड्स रोगाचा प्रसार रोखण्याकरित कंडोमपेक्षा लोकांमध्ये 'एकनिष्ठपणा' असणे अधिक आवश्यक आहे, असे ते म्हणाले होते. दरम्यान डॉ.हर्,वर्धन यांच्या त्यांच्या व्हिजन डॉक्युमेंटवर सामाजिक आरोग्य क्षेत्रामधील काही कार्यकर्त्यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.