प्लॅस्टिक राष्ट्रध्वजांवर बंदी
By Admin | Updated: June 16, 2014 04:03 IST2014-06-16T04:03:39+5:302014-06-16T04:03:39+5:30
स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजांवर बंदी घातली आहे.

प्लॅस्टिक राष्ट्रध्वजांवर बंदी
मिलिंदकुमार साळवे, श्रीरामपूर (जि. नगर)
स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजांवर बंदी घातली आहे. त्यानुसार राज्य सरकारनेही बंदी घातली आहे.
२६ जानेवारी व १५ आॅगस्टला विविध सरकारी, निमसरकारी तसेच खासगी संस्थांमार्फत ध्वजारोहण समारंभ होतात. राष्ट्रध्वजाविषयीचे आपले प्रेम, निष्ठा, अभिमान दाखविण्यासाठी वैयक्तिकरीत्या छोट्या कागदी व प्लॅस्टिक राष्ट्रध्वजांचा वापर होतो. शालेय विद्यार्थी व लहान मुलांसह अनेक व्यक्ती राष्ट्रभक्ती व उत्साहापोटी मोठ्या प्रमाणात राष्ट्रध्वज विकत घेतात. मात्र हे ध्वज त्याच दिवशी किंवा नंतर रस्त्याकडेला, जमिनीवर पडलेले आढळतात. प्लॅस्टिक लवकर नष्ट होत नसल्याने राष्ट्रध्वजाचा अवमान होतो.
राष्ट्रप्रतिष्ठेच्या दृष्टीने ही बाब गंभीर असल्याने केंद्रीय गृह मंत्रालयाने प्लॅस्टिकचे राष्ट्रध्वज वापरण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजनिर्मितीस पायबंद घालण्यासाठी त्याचे उत्पादक, विक्रेते व वितरकांवर सरकारी यंत्रणांनी कारवाई करावी, असे आदेश राज्याच्या गृह विभागाने १४ जून रोजी दिले आहेत.
राष्ट्रध्वजाचा अवमान करणे व त्याची विटंबना होणे हे बोधचिन्हे व नावे (अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम, १९५० व राष्ट्रीय प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम, १९७१ तसेच ध्वजसंहितेच्या तरतुदीनुसार दंडनीय गुन्हा आहे. त्यामुळे जनतेच्या वैयक्तिक वापरासाठी छोट्या कागदी ध्वजाचा वापर करावा. पण त्यांचा वापर करताना त्याचा योग्य मान राखावा.
राष्ट्रध्वज रस्त्यावर वा अन्य ठिकाणी फेकून देऊ नये. राष्ट्रध्वज खराब झाल्याचे आढळल्यास ध्वजसंहितेतील तरतुदीनुसार नष्ट करावेत. राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये, यासाठी तसेच राष्ट्रध्वजासाठी प्लॅस्टिकचा वापर होणार नाही, यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना सर्व कार्यालयांना देण्यात आल्या आहेत.