भ्रष्टाचा-यांसाठी आले बुरे दिन - नरेंद्र मोदी
By Admin | Updated: May 25, 2015 17:58 IST2015-05-25T17:58:14+5:302015-05-25T17:58:14+5:30
ज्यांचे काळे धंदे बंद झाले, दलाली बंद झाली अशा भ्रष्टाचारी लोकांसाठी बुरे दिन आले असून, बाकी सगळ्या भारतीयासांठी गेल्या एका वर्षात अच्छे दिन आल्याचे

भ्रष्टाचा-यांसाठी आले बुरे दिन - नरेंद्र मोदी
लोकमत ऑनलाइन
दीनदयाळ उपाध्याय धाम, मथुरा, दि. २५ - ज्यांचे काळे धंदे बंद झाले, दलाली बंद झाली अशा भ्रष्टाचारी लोकांसाठी बुरे दिन आले असून, बाकी सगळ्या भारतीयासांठी गेल्या एका वर्षात अच्छे दिन आल्याचे आग्रही प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील सभेत बोलताना केले. गेलं संपूर्ण वर्ष घोटाळाविरहीत होतं, एकही भ्रष्टाचाराचं प्रकरण झालं नाही असं सांगतानाच नवी दिल्लीमधली दलालीची सगळी केंद्र बंद पडल्याचं मोदी म्हणाले. ज्यांची दलाली बंद झाली आणि भ्रष्टाचाराची कुरणं बंद झाली तेच आज बुरे दिन आल्याचं सांगतअसून अशा लोकांसाठी आणखी वाईट दिवस येणार असल्याचंही मोदी म्हणाले.
आपलं सरकार गरीबांसाठीच काम करणारं असल्याचं सांगताना मोदींनी जनधन योजना, विमा योजना, पेन्शन योजना, पंतप्रधान कृषी सिंचन योजना, डायरेक्ट कॅश ट्रान्सफर असे अनेक दाखले दिले आणि गरीबांचीच फौज गरीबीविरोधात लढण्यासाठी उभारत असल्याचे सांगितले.
पंतप्रधानांच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे:
- लघुउद्योजक भारतात सहा कोटी असून त्यांच्यासाठी मुद्रा बँकेची योजना असून सध्या हे छोटे छोटे उद्योजक १२ कोटी लोकांना रोजगार देतात, ते २० कोटी लोकांना रोजगार देतील असं आपलं प्रयोजन आहे.
- या वर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत ६ लाख विदेशी पर्यटक भारतात जास्त आले आहेत. त्यामुळे पर्यटन क्षेत्रातल्या लोकांना काम मिळालं आहे.
- गेल्या वर्षी जितका पांढरा पैसा देशाबाहेर गेला होता, त्याच्या केवळ यंदा १० टक्के गेला, ९० टक्के भारतात राहिला कारण उद्योजकांना आता भारतात काम करण्यामध्ये रसवाटू लागला आहे.
- जीवन विमा, अटल पेन्शन योजना, महागाईवर मात अशा अनेक जनकल्याण योजना आम्ही एका वर्षात अमलात आणल्या आहेत. विदेशी गुंतवणूक गेल्या वर्षीच्या तुलनेत आठपटीने वाढून २५ हजार कोटी रुपयांची झाली आहे.
- कायद्याचं जंजाळ कमी करण्याचा निर्णय आम्ही घेतला असून येत्या काळात गरज नसलेले एकूण १३०० कायदे आम्ही संपवलेले असतिल. अनेक बंद केले काही बंद करणार.
- खत उत्पादन करणा-या कंपन्यांची क्षमता वाढवण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि २० लाख टन जास्त उत्पादन होईल आणि चार लाख कोटी रुये युरीया आयातीमध्ये वाचणार आहेत.
- गेल्या तीस वर्षात जे शक्य झालं नाही ते आम्ही साध्य केलं आहे. या वर्षी विक्रमी विजेचं उत्पादन झालं असून आणखी जास्त प्रमाणात वीज निर्मिती करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- येत्या पाच वर्षांत नद्या जोडणी प्रकल्प, पाणी थांबवा जिरवा धोरण असो किंवा सगळ्या शेतक-यांना पाणी मिळण्यासाठी पंतप्रधान कृषी सिंचन योजना लागू करणार.
- शेतक-यांच्या आत्महत्या लाखाच्या घरात गेल्या आहेत. यावर राजकारण न करता यावर उत्तर शोधायला हवं, मार्ग काढायला हवा हे आमचं धोरण आहे. सॉइल हेल्थ कार्ड हे त्या दिशेने उचललेले पाऊल आहे.
- मनरेगा, गॅस सबसिडी आदी योजनांच्या माध्यमातून थेट लोकांच्या बँक खात्यात सबसिडीची रक्कम जमा होते, त्यामुळे ब्लॅक मार्केटमध्ये गॅस विकण्याचा काळा धंदा बंद झाला.
- दिल्लीमधून एक रुपया जनतेसाठी खर्च झाला तर प्रत्येक रुपया थेट गरजू माणसाच्या हातात मिळेल अशी व्यवस्था आम्ही निर्माण केली आहे.
- दिल्लीमधली सगळी दलालांची दुकानं आम्ही बंद केली असून अशा भ्रष्टाचा-यांसाठी बुरे दिन आल्याचं मोदी म्हणाले. देशाच्या संपत्तीला लुटलं जाऊ देणार नाही.
- भ्रष्टाचार बंद करण्याचं आश्वासन मी जनतेला दिलं होतं, जे आश्वासन एका वर्षात मी पाळलं आहे. ज्या कोळशाच्या खाणी आधीच्या सरकारनं लुटल्या त्यातून आता लाखो कोटी रुपये सरकारला मिळणार आहेत.
- एका वर्षात परीवर्तन झाले असून भ्रष्टाचार, घोटाळ्याची खबर आली आहे का असे लोकांना विचारत मोदींनी सभेला बोलतं करायचा प्रयत्न केला.
- जर निवडणुका एक वर्षापूर्वी न होता आज झाल्या असत्या तर देश किती बुडालेला असता हे समजलं असतं. सध्याच्या सरकारमुळे परीवर्तन आलं आहे, आधीच्या सरकारच्या काळात बुरे दिन होते, घोटाळे होत होते, रीमोर्ट कंट्रोलवर सरकार चालत होतं, नेते जेलमध्ये जात होते, कोळसा, स्पेक्ट्रममध्ये पैसे खाल्ले जात होते.
- महात्मा गांधी, राम मनोहर लोहिया व दीनदयाळ उपाध्याय या तिघांच्या चिंतनाचा भारतीय राजकारणावर परिणाम झाला आहे. तिघांनी नेहमीच भारताच्या तळाच्या माणसाचा विचार केला.
- केंद्र सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त शहरामध्ये भव्य सभेचे आयोजन न करता जाणुनबुजून ग्रामीण भागात सभा घेण्याचे मी ठरवले. तसेच दीनदयाळ उपाध्याय वा श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जन्मस्थळी त्यांच्या स्मृतींना नमन करण्याचा व एका वर्षाचा हिशोब देण्याचे मी पक्षाला सुचवले.
- ही कृष्णाची भूमी असून कर्माचे महत्त्व कृष्णाने सांगितले त्याचप्रमाणे या ठिकाणी जन्मलेल्या दीनदयाळ उपाध्याय यांचाही संदेश होता सतत काम करत रहा, थांबू नका, न थकता काम करत रहा.