बाबांचा उत्साह तरुणांनाही लाजवणारा!
By Admin | Updated: October 6, 2014 04:25 IST2014-10-06T04:25:42+5:302014-10-06T04:25:42+5:30
निवडणूक असो वा नसो माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दिवस पहाटे ६ ला सुरू होतो. थोडाफार व्यायाम अन् तयार झालेत की ते सकाळी आठ-साडेआठला कामाला लागतात ते थेट रात्री २ पर्यंत

बाबांचा उत्साह तरुणांनाही लाजवणारा!
यदु जोशी, मुंबई
निवडणूक असो वा नसो माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दिवस पहाटे ६ ला सुरू होतो. थोडाफार व्यायाम अन् तयार झालेत की ते सकाळी आठ-साडेआठला कामाला लागतात ते थेट रात्री २ पर्यंत. वय आहे फक्त ६८. सध्या प्रचाराच्या निमित्ताने त्यांच्यातील उत्साह तिशीतल्या तरुणाला लाजवेल असा आहे. काँग्रेस त्यांच्या नेतृत्वात लढत असल्याने उद्या ते मुख्यमंत्री पदाचे दावेदार असतील.
स्वच्छ आणि पारदर्शक कारभाराचा वस्तुपाठ ठरलेल्या पृथ्वीराजबाबांसोबत प्रचाराच्या निमित्ताने शनिवारी एक दिवस घालवता आला. ते स्वत: दक्षिण कऱ्हाडमधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. कऱ्हाडमधील पाटण ्रकॉलनीतील त्यांच्या बंगल्यावर सकाळी ७ पासूनच गाठीभेटी सुरू झाल्या. तीन तासांनी त्यांना राज्यातील प्रचारसभांसाठी कऱ्हाड सोडायचे होते. त्यापूर्वीे खास विश्वासू माणसांशी चर्चा त्यांनी चर्चा केली. लहानमोठ्या संघटना, काँग्रेसच्या फ्रंटल संघटनांचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी बोलले.
बऱ्याच नेत्यांकडे असा दरबार भरला की नेत्याच्या आणि गर्दीच्याही बोलण्यात एक प्रकारची गुर्मी, विरोधकांना निपटून घेण्याची भाषा असते. बाबांच्या बंगल्यावर असले काही चालत नाही. ‘आपण कऱ्हाडसाठी काय चांगलं केलं तेवढ सांगा, पॉझिटीव्ह प्रचार करा’, हे समजवण्यावर त्यांचा भर असतो. प्रचार यंत्रणा दिवसभर कुठे, कशी राबवायची याची मुख्यत्वे चर्चा होते. आलेल्या कार्यकर्त्यांच्या चहानाश्त्याची काळजी चव्हाण यांच्या पत्नी सत्वशिला करीत असतात.
कऱ्हाडच्या गजानन हॉटेलमधील मिसळ पाव खायला गेलो. तिथे लोक सध्याच्या राजकारणावर बोलले.‘बाबा भला माणूस आहे पण काका बी तितकाच भला आहे’, असे त्यांचे मत. सातवेळा आमदार असलेले विलासकाका उंडाळकर आणि पृथ्वाराज बाबा अशा दोन भल्या माणसांमधील टक्कर सध्या कऱ्हाड अनुभवतेय. बाबांना मत देणार की काकांना हे लोक स्पष्टपणे सांगतात पण कोणीतरी एक भला माणूस हरणार याची बोचही बोलण्यात असते.
मनात विचार येतो अशी सगळीकडेच भल्या माणसांमध्ये लढत व्हायला हवी. लोकसभेच्या एका निवडणुकीत राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील यांनी काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव केला होता. ‘मी जिंकलो याचा आनंद मला आहे पण माझ्यापेक्षा जास्त योग्यतेचा माणूस हरला याचे दु:ख अधिक आहे’, ही श्रीनिवास पाटील यांची प्रतिक्रिया होती. या निमित्ताने त्या प्रतिक्रियेचे स्मरण होते.
चव्हाण १० च्या सुमारास कऱ्हाडच्या धावपट्टीवर पोहोचतात. छोटेखानी विमान तयार असते. पायलटची ते आस्थेने विचारपूस करतात. विदर्भातील प्रचारसभांसाठी विमानाने अकोल्याला रवाना होतात. तिथून पुढे हेलिकॉप्टरने प्रवास सुरू होतो.
हेलिकॉप्टरमधून खाली डोकावताना,विदर्भाची शेती सुपीक असूनही इथल्या शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागते याचे शल्य ते बोलून दाखवतात. विदर्भात उद्योग नाहीत. सगळा औद्योगिक विकास पुणे, मुंबई, ठाणे, नाशिकमध्ये झाला. विकेंद्रीकरण व्हायला हवे होते. म्हणूनच मी नवे औद्योगिक धोरण आणले. आता हळुहळु त्याचे परिणाम दिसतील. पण तेवढे पुरेसे नाही. येथे लघु उद्योगांना प्रचंड बळ देण्याची गरज आहे आणि इथली शेती तितक्याच नफ्याची करणे आवश्यक आहे. म्हणूनच मी शाश्वत शेतीची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली. पुढच्या पाच वर्षांसाठी सत्ता मिळाली तर या दोन वरील तिन्ही विषयांना माझे सर्वोच्च प्राधान्य राहील, असे ते सांगतात. मी पश्चिम महाराष्ट्रातील आहे म्हणून बोलत नाही पण विदर्भातील नेत्यांनी वेळोवेळी इच्छाशक्ती दाखविली नाही, अशी खंतही व्यक्त करतात.