आझम खानच्या म्हशींना पोलिसांचे सुरक्षा कवच
By Admin | Updated: August 22, 2014 13:31 IST2014-08-22T13:31:45+5:302014-08-22T13:31:45+5:30
उत्तरप्रदेशमधील समाजवादी पक्षाचे नेते व अल्पसंख्यांक मंत्री आझम खान यांच्या म्हशी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरल्या आहेत.

आझम खानच्या म्हशींना पोलिसांचे सुरक्षा कवच
ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. २२ - उत्तरप्रदेशमधील समाजवादी पक्षाचे नेते व अल्पसंख्यांक मंत्री आझम खान यांच्या म्हशी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरल्या आहेत. आझम खान यांच्या म्हशींना चोख पोलिस बंदोबस्त पुरवण्यात आला असून म्हशींच्या 'खातीरदारी'साठी पोलिस कर्मचा-यांनाच जुंपण्यात आले होते.
दुग्धव्यवसाय करणारे आझम खान यांच्यासाठी सहारनपूरमधील श्रमविभागाचे अध्यक्ष सरफराज खान यांनी पंजाबहून पाच म्हशी मागवल्या होत्या. या म्हशी सहारनरपूर मार्गे रामपूरमध्ये जाणार होत्या. बुधवारी रात्री या म्हशी हरियाणामार्गे उत्तरप्रदेशमध्ये दाखल झाल्या. सहारनपूरमधील गागलहेडी पोलिस ठाण्यात या म्हशींच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली होती असे स्थानिक वृत्तपत्रांनी म्हटले आहे. या म्हशी आझम खान यांच्यासाठी आणल्याचे समजताच पोलिस ठाण्यातील कर्मचा-यांची धावपळ सुरु झाली. काही पोलिस म्हशींसाठी चारा आणायला गेले तर काहींनी म्हशींसाठी चपाती बनवली. यावर कळस म्हणजे काही पोलिस कर्मचारी म्हशींचे शेण उचलून गाडीची साफसफाईदेखील केली. गुरुवारी सकाळी म्हशींना चोख पोलिस बंदोबस्तात मुजफ्फरनगरपर्यंत सोडण्यात आले अशी माहिती सूत्रांनी दिली. उत्तरप्रदेश पोलिसांनी हे वृत्त्त फेटाळले आहे.