अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरात मागील काही महिन्यांमध्ये लाखो भाविकांच्या ओघामुळे प्रचंड सुरक्षा तैनाती करण्यात आली होती. विशेषतः महाकुंभमेळ्याच्या काळात एसआयएस (SIS) या खासगी सुरक्षा एजन्सीमार्फत सुमारे ४५० सुरक्षा रक्षक मंदिर परिसरात तैनात करण्यात आले होते. मात्र, आता गर्दीचा ओघ कमी झाल्याने मंदिर प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणेने या व्यवस्थेत बदल करण्यास सुरुवात केली आहे.
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एसआयएसने तब्बल २५० पुरुष आणि महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले असून, त्यांचे प्रवेश पासही रद्द करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, मंदिर परिसरात अतिशय संवेदनशील जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांचाही यात समावेश आहे.
नेमकं करण काय?या मागचं कारण गर्दी आणि उत्पन्नात घट ही एक बाजू असली, तरी काही कर्मचाऱ्यांवर गैरवर्तन, शिस्तभंग आणि दर्शन/आरती पासांच्या नावाखाली अनधिकृत वसुलीचे गंभीर आरोपही असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे मंदिराच्या सुरक्षेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, रामजन्मभूमीची प्रतिमा डागाळल्याची भावना काहींनी व्यक्त केली आहे.
मंदिर ट्रस्टचा सहभाग नाही!मंदिर प्रशासन मात्र या संपूर्ण घडामोडींवर बोलण्यास टाळाटाळ करत आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, ही नियुक्ती व सेवा समाप्ती ही एजन्सी आणि संबंधित संस्थांमधील अंतर्गत बाब असून, मंदिर ट्रस्ट यामध्ये थेट सहभागी नाही.
सध्या राम मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्था पुन्हा संतुलित केली जात असून, उरलेल्या रक्षकांवर अधिक जबाबदारी पडली आहे. मात्र, ज्यांची उपजीविका या नोकऱ्यांवर अवलंबून होती, अशा कुटुंबांसाठी ही अचानक झालेली कपात मोठा आर्थिक धक्का ठरत आहे.