‘पुरस्कार वापसी’ अन् असहिष्णुतेचे कवित्व सुरूच
By Admin | Updated: November 1, 2015 00:30 IST2015-11-01T00:30:53+5:302015-11-01T00:30:53+5:30
विविधतेत एकता हे या देशाचे वैशिष्ट्य असून, त्याची जपणूक करण्याची गरज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शनिवारी व्यक्त केली. सर्वसमावेशकता आणि सहिष्णुतेच्या बळावरच

‘पुरस्कार वापसी’ अन् असहिष्णुतेचे कवित्व सुरूच
नवी दिल्ली : विविधतेत एकता हे या देशाचे वैशिष्ट्य असून, त्याची जपणूक करण्याची गरज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शनिवारी व्यक्त केली. सर्वसमावेशकता आणि सहिष्णुतेच्या बळावरच भारत समृद्ध झाला असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. गेल्या आठवड्यात अनेकदा वाढत्या असहिष्णुतेविरुद्ध चिंता व्यक्त करणारे राष्ट्रपती येथे दिल्ली उच्च न्यायालयाच्या सुवर्ण जयंती समारंभात बोलत होते. आमच्या प्राचीन सभ्यतांनी गेल्या अनेक शतकांपासून या विविधतेचे जतन केले आहे. याकडे लक्ष वेधताना मुखर्जी म्हणाले की, बहुविधता ही आमची सामूहिक शक्ती असून, राज्यघटनेच्या विविध तरतुदींमधूनही आम्हाला त्याचा प्रत्यय येतो.
याप्रसंगी सरन्यायाधीश एच.एल. दत्तू, दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जी. रोहिणी, दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित होते. काही बाबींमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी राजकीय स्तरावर अत्यधिक अचूकता किंवा सतर्कता बाळगल्याने प्रगतीचा मार्ग खुंटतो. प्रगतीसाठी परस्पर आदर आणि सहिष्णुता याची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी केले आहे. ते येथे आयआयटी दिल्लीच्या पदवीदान समारंभात बोलत होते.
ते म्हणाले की, एखाद्याच्या विचाराने बौद्धिक समूहाला इजा होत असेल तर त्यावर बंदी घातली पाहिजे काय, असे विचारले असता ते म्हणाले की, लगेचच बंदी घातल्यास चर्चा बंद होते. त्यामुळे एक मार्ग बंद होतो. त्वरित बंदीस माझा विरोध आहे.
साहित्यिकांचे निषेधसत्र थांबेना; साहित्य अकादमी पेचात
देशातील कथित असहिष्णुतेचा निषेध करण्यासाठी विविध साहित्यिकांनी आपले पुरस्कार परत करण्याचे सत्र सुरू केल्याने साहित्य अकादमी चांगलीच पेचात आली आहे.
आतापर्यंत अनेक साहित्यिकांनी आपले सन्मानचिन्ह आणि पुरस्काराची रोख रक्कम साहित्य अकादमीला परत पाठविली आहे; पण साहित्य अकादमीने अद्यापपर्यंत पुरस्कारांची रक्कम स्वीकारलेली नाही.
तेलुगू साहित्यिक एम. भूपल रेड्डी यांचा २०११ मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला होता. त्यांनी पुरस्कारापोटी मिळालेले ५० हजार रुपये रोख बँकेतच ठेवले होते. ते पैसे काढून घेतले नाहीत.
त्यांनी अलीकडेच पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आणि तेवढ्याच रकमेचा धनादेश व मानचिन्ह त्यांनी साहित्य अकादमीला परत पाठविले. त्यांनी धनादेश पाठवून १५ दिवस उलटून गेले; पण त्यांच्या खात्यातील रक्कम जशीच्या तशीच आहे. साहित्य अकादमीने त्या पैशाला हात लावलेला नाही. भूपल रेड्डी यांच्याप्रमाणेच देशाच्या अनेक भागांतून साहित्य अकादमीला दररोज पार्सल येत आहेत; पण अकादमीने त्यांना हात लावलेला नाही. ते पार्सल तसेच पडून आहेत.
याबाबत साहित्य अकादमीचे सचिव के. श्रीनिवासराव
म्हणाले की, साहित्यिकांनी त्यांचे पुरस्कार पाठविले असले तरीही आम्ही ते स्वीकारत नाही. ते फक्त आमच्या
कार्यालयात ठेवण्यात आले आहेत. आम्ही धनादेशांनाही हात लावलेला नाही. साहित्य अकादमीचे कार्यकारी मंडळच याबाबत निर्णय घेईल.