डेहराडून - माणाजवळील हिमस्खलनामुळे अडकलेल्या १७ कामगारांना शनिवारी सकाळी रेस्क्यू करण्यात आलं. या कामगारांवर सैन्य दलाच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत या दुर्घटनेतून एकूण ५० कामगारांना रेस्क्यू करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी स्वत: या संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशनवर लक्ष ठेवून आहेत. शनिवारी सकाळी मुख्यमंत्री धामी यांनी घटनास्थळाची हवाई सर्वेक्षण केले आणि ज्योतिर्मठ इथल्या बचाव कार्याचा आढावा घेतला. दुर्घटनेत अडकलेल्या ५ कामगारांच्या शोधासाठी युद्धपातळीवर रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.
शनिवारी घटनास्थळी आढावा घेतलेल्या मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी राज्य आपात्कालीन संचालन केंद्राला भेट देत तिथे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, बचाव पथकाने आतापर्यंत ५० जणांना सुखरूप बाहेर काढलं आहे. हिमस्खलनामुळे अडकलेल्या आणखी ५ कामगारांचा शोध युद्धपातळीवर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही फोन करून या दुर्घटनेची माहिती घेतली त्यासोबत शक्य तितकी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हेदेखील कामगारांच्या सुरक्षेबाबत चिंतित आहेत. ते सातत्याने रेस्क्यू ऑपरेशनची माहिती घेत आहेत. केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या मदतीबाबत मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे आभार मानले आहेत.
या दुर्घटनेतील ५ कंटेनरला ट्रेस करून कामगारांना सुरक्षित काढण्यात बचाव पथकाला यश आलं आहे. जास्त बर्फवृष्टीमुळे अद्यापही ३ कंटेनर सापडले नाहीत. आर्मी, आईटीबीपीकडून कंटेनरचा शोध घेतला जात आहे. कंटेनर शोधण्यासाठी लष्कराचे स्निफर डॉग तैनात करण्यात आले आहेत. लष्कराच्या ३ टीमकडून पेट्रोलिंग सुरू आहे. दिल्लीत सैन्याचे जीपीआर रडार, ग्राऊंड पेनीट्रेशन रडार मागवण्यात आलेत जे बर्फाच्या आतमध्ये दबलेल्या कंटेनरचा शोध घेतील अशीही माहिती मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दिली.
दरम्यान, जखमी कामगारांच्या उपचारासाठी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. माणा आणि ज्योतिर्मठ येथे लष्कराच्या हॉस्पिटलमध्ये जखमी कामगारांवर उपचार सुरू आहेत. एम्स ऋषिकेश आणि श्रीनगर मेडिकल कॉलेजसोबत स्थानिक सीएचसी, पीएचसी यांनाही अलर्ट केले आहे. यावेळी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपाध्यक्ष विनय कुमार रुहेला, डीजीपी दीपम सेठ, प्रधान सचिव आर.के. सुधांशू, सचिव शैलेश बागौली, सचिव पंकज कुमार पांडे, आयुक्त गढवाल विनय शंकर पांडे, आपत्ती व्यवस्थापन आणि पुनर्वसन सचिव विनोद कुमार सुमन, जीओसी उत्तराखंड उप-क्षेत्र मेजर जनरल प्रेम राज, आयटीबीपी आयजी संजय गुंज्याल, आयजी एसडीआरएफ रिद्धिम अग्रवाल, पोलिस महानिरीक्षक गढवाल रेंज राजीव स्वरूप, यूएसडीएमए एसीईओ अंमलबजावणी डीआयजी राजकुमार नेगी, वित्त नियंत्रक अभिषेक आनंद, जेईओ मोहम्मद ओबैदुल्लाह अन्सारी इत्यादी उपस्थित होते.