ऑस्ट्रेलिया- पाक सामना

By Admin | Updated: March 20, 2015 22:40 IST2015-03-20T22:40:14+5:302015-03-20T22:40:14+5:30

ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत

Australia-Pak match | ऑस्ट्रेलिया- पाक सामना

ऑस्ट्रेलिया- पाक सामना

्ट्रेलिया उपांत्य फेरीत
पाकवर सहा गड्यांनी मात : आता लढत भारताविरुद्ध
ॲडिलेड : हेजलवूडच्या नेतृत्वात गोलंदाजांनी केलेल्या भेदक कामगिरीपाठोपाठ शेन वाटसन तसेच स्टीव्हन स्मिथ यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने शुक्रवारी पाकिस्तानवर विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व सामन्यात सहा गडी राखून शानदार विजय नोंदविला. यामुळे भारत-ऑस्ट्रेलिया ही रोमहर्षक उपांत्य लढत २६ मार्च रोजी सिडनी मैदानावर निश्चित झाली आहे.
पाकने ऑस्ट्रेलियाला २१४ धावांचे लक्ष्य दिले होते. स्मिथच्या ६९ चेंडूत ६५ आणि वाटसनच्या ६६ चेंडूंतील सात चौकार व एका षटकारासह ठोकलेल्या नाबाद ६४ धावांच्या बळावर ३३.५ षटकांत चार बाद २१६ धावा करीत विजय साकार केला. मॅक्सवेलने २९ चेंडूत नाबाद ४४ धावांचे योगदान दिले. वाटसनने स्मिथसोबत चौथ्या गड्यासाठी ८९ धावांची तसेच मॅक्सवेलसोबत पाचव्या गड्यासाठी ७.१ षटकांत नाबाद ६८ धावांची भागीदारी करीत ९७ चेंडू आधीच विजयावर शिक्कामोर्तब केले. पाकला खराब क्षेत्ररक्षणाचा फटका बसला. त्यांच्या क्षेत्ररक्षकांनी वाटसन आणि मॅक्सवेल यांचे झेल सोडल्याने ऑस्ट्रेलियाचा विजय सोपा झाला.
त्याआधी हेजलवूडच्या ३५ धावांतील चार बळींमुळे पाकचा संघ ४९.५ षटकांत २१३ धावांत गारद झाला. मिशेल स्टार्क आणि मॅक्सवेल यांनी हेजलवूडला साथ देत ४० आणि ४३ धावांत प्रत्येकी दोन गडी बाद केले. जॉन्सन आणि फॉल्कनर यांनी एकेक गडी टिपला. ऑस्ट्रेलियाची सुरुवातही वाईट झाली. सलामीचा ॲरोन फिंच २ हा तिसऱ्या षटकांत सोहेलच्या चेंडूवर पायचित झाला. त्याने रेफरल मागितले पण तिसऱ्या पंचाने हा निर्णय योग्य ठरविला. दुसरा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याने काहीं आकर्षक फटके मारले पण तो देखील २४ धावा काढून वहाब रियाझचा बळी ठरला. वहाबने सतत टिच्चून मारा करीत ऑस्ट्रेलियावर दडपण आणले होते. कर्णधार मायकेल क्लार्क ८ याला फॉरवर्ड शॉर्टलेगवर झेल देण्यास बाध्य करताच ऑस्ट्रेलियाची स्थिती ३ बाद ५९ अशी झाली.
वहाबने वाटसनला देखील वारंवार त्रस्त केले. वाटसन अनेकदा बाद होण्यापासून बचावला. चार धावांवर असताना फाईन लेगवर राहत अलीने त्याचा सोपा झेल सोडला. वासन- स्मिथ यांनी डाव सावरल्यानंतर स्मिथने ५१ चेंडूंत अर्धशतक गाठले. अर्धशतकानंतर स्मिथ एहसान आदीलच्या चेंडूवर पायचित झाला. मॅक्सवेलला सुरुवातीलाच वहाब रियाझच्या चेंडूवर सोहेलने झेल सोडताच जीवदान मिळाले. दोन्ही झेल सोडल्याने वहाबने स्वत:ची चिडचिड मैदानावरच जाहीर केली. दरम्यान वाटसनने ५८ चेंडूंत स्वत:चे ३३ वे अर्धशतक गाठले. पाच चौकार आणि दोन षटकार मारणाऱ्या वाटसनने सोहेल खानला चौकार ठोकून सामना संपविला.
पाककडून हारिस सोहेल याने सर्वाधिक ४१ आणि कर्णधार मिस्बाहने ३४ धावा केल्या. पाकचा एकही फलंदाज चांगल्या सुरुवातीचा लाभ उठवू शकला नाही. एहसान आदील १५ राहत अली ६ यांनी काहीसा प्रतिकार करीत संघाच्या २०० धावा फळ्यावर लावल्या. सलामीवीर सर्फराज १० आणि त्याचा सहकारी अहमद शहजाद ५ हे लवकर बाद झाले. हारिस- मिस्बाह यांनी तिसऱ्या गड्यासाठी ७३ धावा करीत संघाला सावरले. मिस्बाह आणि हारिस बाद होताच पाकच्या ५ बाद १२४ धावा झाल्या होत्या. आफ्रिदीने १५ चेंडूंत तीन चौकार व एका षटकारासह २३ धावा केल्या पण तो देखील हेजलवूडच्या चेंडूवर सीमारेषेजवळ फिंचकरवी झेलबाद होऊन परतला. (वृत्तसंस्था)
..........................................................

Web Title: Australia-Pak match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.