सुरेश भटेवरा । लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : काश्मीर खोऱ्यातील अशांतता आणि सद्य:स्थिती बदलण्यासाठी मोदी सरकारने आता रेल्वे मंत्रालयाचे माध्यम निवडले आहे. पंतप्रधानांनी रेल्वे मंत्रालयाला स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, असे प्रयत्न करा की श्रीनगर, कारगिल आणि भारताचे अन्य भाग लवकरात लवकर रेल्वेमार्गाने जोडले जातील. काश्मीरमध्ये लोकांचे जाणे-येणे वाढले तर तिथला पर्यटन व्यवसाय सुधारेल आणि सध्याची परिस्थिती निवळायलाही मदत होईल.उधमपूर जवळ सर्वाधिक लांबीच्या अत्याधुनिक बोगद्याच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त आयोजित सभेत काश्मीरच्या तरुणांना आवाहन करताना मोदींनी सवाल केला होता की काश्मीरचे भाग्य बदलण्यासाठी ‘टेररिझम हवे की टुरिझम?’ त्याला अनुसरून रेल्वेच्या प्रलंबित योजनांचा आढावा घेण्याच्या बैठकीत, भारतीय रेल्वेला मिशन काश्मीर सुरू करण्याच्या सूचना पंतप्रधानांनी दिल्या आहेत. वैष्णोदेवीपर्यंत जाणारा कटरा बनिहाल लोहमार्ग तसेच लोहमार्गाचे काम केवळ श्रीनगरपर्यंतच नव्हे तर कारगिलपर्यंत येत्या तीन वर्षांत पोहोचले पाहिजे, यासाठी रेल्वेने युद्धपातळीवर प्रयत्न करावेत, अशा सूचना पंतप्रधानांनी या बैठकीत दिल्या. जम्मू काश्मीरसाठी जे ८0 हजार कोटींचे विशेष पॅकेज केंद्र सरकारने देऊ केले आहे, त्यातला एक हिस्सा काश्मीरच्या लोहमार्गांसाठी राखून ठेवावा, असेही पंतप्रधानांनी सुचवले.
रेल्वेद्वारे काश्मीर खोऱ्याची स्थिती बदलण्याचा प्रयत्न
By admin | Updated: May 22, 2017 03:26 IST