२२ कोटींची रोकड पळविणारा अटकेत
By Admin | Updated: November 28, 2015 00:17 IST2015-11-28T00:17:16+5:302015-11-28T00:17:16+5:30
बँकेची २२.५ कोटींची रोकड असलेली कॅश व्हॅन घेऊन पसार झालेल्या चालकाला दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी अवघ्या १२ तासांच्या आत अटक केली

२२ कोटींची रोकड पळविणारा अटकेत
नवी दिल्ली : बँकेची २२.५ कोटींची रोकड असलेली कॅश व्हॅन घेऊन पसार झालेल्या चालकाला दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी अवघ्या १२ तासांच्या आत अटक केली. त्याच्या ताब्यातील पळविलेली रोकडही जप्त करण्यात आली आहे.
प्रदीप शुक्ला (३५) असे अटक झालेल्या चालकाचे नाव आहे. पोलिसांनी पहाटेच्या सुमारास दिल्लीच्या ओखला औद्योगिक परिसरातील एका गोदामावर छापा घालून शुक्ला याला अटक केली. त्याने गोदामात लपवून ठेवलेल्या नऊ पेट्याही ताब्यात घेतल्या. त्यात ही २२.५ कोटींची रोकड ठेवली होती. शुक्लाने बँकेची कॅश व्हॅन पळविल्यानंतर त्यातील रोकड असलेल्या पेट्या या इलेक्ट्रिक वायरच्या गोदामात आणून ठेवल्या होत्या. त्याने या रकमेपैकी ११५०० रुपये कपडे आणि आणि अन्य वस्तूंवर खर्च केले आहेत, असे पोलिसांनी सांगितले. शुक्ला हा या गोदामाच्या चौकीदाराला ओळखत होता आणि त्यामुळे त्याने रात्रभरासाठी तेथे आसरा मागितला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी गोदाम सोडून जाण्याचा त्याचा डाव होता. परंतु त्याआधीच पोलिसांनी त्याला बेड्या घातल्या.
(लोकमत न्यूज नेटवर्क)