दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर बुधवारी एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान हल्ला झाला. याप्रकरणी दिल्लीमधील सिव्हिल लाइन्स पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला नियोजित कट असल्याचे हे त्यांच्या शालीमार बाग येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले आहे. हल्ल्याच्या २४ तासआधी आरोपी हा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाची रेकी करताना दिसला. हा व्हिडिओ पोलिसांकडे सोपवण्यात आला आहे.
एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान हल्लेखोर हा रेखा गुप्ता यांना कागद देण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडे गेला आणि त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोराने त्यांच्या कानशिलात लगावली आणि त्यांचे केस ओढण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत रेखा गुप्ता यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली.
राजेश खिमजी साकारिया (वय, ४१) असे हल्लेखोराचे नाव असून तो गुजरातमधील राजकोट येथील रहिवासी आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा एक नातेवाईक तुरुंगात आहे आणि त्यांनी त्यांची सुटका करण्यासाठी त्याने अर्ज आणला होता. राजेशबद्दल माहिती मिळवण्यासाठी दिल्ली पोलिसांनी गुजरात पोलिसांशी संपर्क साधला आहे.
दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा म्हणाले की, सार्वजनिक सुनावणीदरम्यान मुख्यमंत्री रेखा गुप्ता नेहमीप्रमाणे जनतेशी बोलत असताना एक व्यक्ती त्यांच्याकडे आला आणि त्यांना काही कागदपत्रे दिली. त्यानंतर त्याने रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला केला. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्या एक खंबीर महिला आहेत. सार्वजनिक सुनावणी सुरूच राहील.