नवी दिल्ली - केंद्रात पहिल्यांदाच भाजपा सत्तेत आली होती. अटल बिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान बनले होते. त्याच काळात विरोधी पक्षाने सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आणि केवळ एका मताने अटलबिहारी वाजपेयी यांचं सरकार पडलं होते. हे मत कुणी दिले, कसं मिळवलं याबाबत ठोस सांगितले नसले तरी शरद पवारांनी तेव्हाचा किस्सा त्यांच्या भाषणात ऐकवला.
निलेशकुमार कुलकर्णी लिखित 'संसद भवन ते सेंट्रल विस्टा: आठवणींचा कर्तव्यपथ' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी शरद पवार म्हणाले की, माझ्या कारकिर्दीबाबत एक गोष्ट फार लोकांना माहिती नाही की मी संसदेत विरोधी पक्ष नेता होतो. माझ्या विरोधी पक्षनेत्याच्या काळात एक घटना घडली. तेव्हा अटल बिहारी वाजपेयींचं सरकार होतं आणि त्यांचे सरकार असताना आम्ही विरोधी पक्षात त्यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मांडला आणि तो ठराव एक मताने मंजूर झाला असं त्यांनी सांगितले.
'ते' एक मत कसं मिळवलं?
आता ते जे एक मत होतं ते मी मिळवलं होतं. कसं मिळवलं ते मी सांगत नाही. ठराव मांडला, चर्चा झाली आणि मध्ये जी वेळ असते त्या वेळेत मी बाहेर गेलो कोणाशी तरी बोललो आणि परत येऊन बसलो आणि सत्ताधाऱ्यांमधील एका व्यक्तीने काही वेगळा निर्णय घेतला आणि एका मताने ते सरकार पडलं आणि त्या वेळेला विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी ही माझ्याकडे होती, हा इतिहास आहे असा खुलासा शरद पवारांनी केला.
दरम्यान, अनेक गोष्टी आहेत त्याबद्दलचा उल्लेख करायचा प्रयत्न हा कुलकर्णींनी केला आहे पण अशा काही घटनांची पुस्तकात आणखी भर घालण्याची आवश्यकता आहे आणि ती भर घालायची असेल तर एकदा तुम्ही, आम्ही आणि संजय राऊत बसुया आणि त्यामध्ये कुठलीही बाजू न घेता वास्तव चित्र हे आपण त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करूया असंही शरद पवारांनी पुस्तक प्रकाशनावेळी सांगितले.
संजय राऊतांच्या टीकेवर पवारांचं भाष्य
एकनाथ शिंदे यांचा सन्मान केल्यामुळे उद्धव ठाकरे गटाने शरद पवारांबाबत नाराजी व्यक्त केली होती. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पवारांवर टीका केली, त्यावरही दिल्लीतल्या कार्यक्रमात शरद पवारांनी भाष्य केले. गेले दहा-बारा दिवस संजय राऊतांची आणि माझी गाठ नव्हती. साधारणतः आमची रोज गाठ-भेट होते. आज सकाळपासून एकच बातमी पाहतोय की, "हे दोघं भेटणार." मला काही समजत नाही एखाद्या बाबतीत एखाद्याचे मत असेल आणि ते प्रामाणिक असेल तर त्याला ते मांडण्याचा अधिकार आहे की नाही? आणि ते मत मांडलं म्हणून लगेच विसंवाद होऊ शकत नाही. अशा अनेक गोष्टी मला सांगता येतील. संजय राऊत यांनी आपल्या आयुष्यातला मोठा काळ ज्यांच्या समवेत घालवला, ज्यांच्याकडून ते शिकले अशा सगळ्या विचाराचे लोक कधीही संकुचित विचार करू शकत नाहीत ते व्यापकच विचार करतील असं सांगत शरद पवारांनी राऊतांच्या टीकेवर भाष्य केले.