Atal Bihari Vajpayee Death: मेणाहून मऊ आणि वज्राहून कठोर असलेले अटलजी

By बाळकृष्ण परब | Published: August 16, 2018 08:09 PM2018-08-16T20:09:18+5:302018-08-16T20:26:44+5:30

Atal Bihari Vajpayee Death: धुरंधर राजकारणी, पत्रकार, लेखक, कवी आणि फर्डे वक्ते अशा बहुआयामी व्यक्तीत्वाचे धनी असलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या व्यक्तिमत्त्वाची खासीयत म्हणजे त्यांचा साधेपणा.

Atal Bihari Vajpayee: atal bihari vajpayee soft and hard corner | Atal Bihari Vajpayee Death: मेणाहून मऊ आणि वज्राहून कठोर असलेले अटलजी

Atal Bihari Vajpayee Death: मेणाहून मऊ आणि वज्राहून कठोर असलेले अटलजी

Next

धुरंधर राजकारणी, पत्रकार, लेखक, कवी आणि फर्डे वक्ते अशा बहुआयामी व्यक्तीत्वाचे धनी असलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या व्यक्तिमत्त्वाची खासीयत म्हणजे त्यांचा साधेपणा. जनसंघाचा सर्वसामान्य कार्यकर्ता, भाजपाच्या संस्थापकांपैकी एक ते भारताचा पंतप्रधान अशा दीर्घ प्रवासात वाजपेयींच्या स्वभावात बदल झाला नाही. पण एरवी मेणाहून मऊ वाटणाऱ्या अटलजींनी वेळप्रसंगी वज्राहून कठोर स्वभावाचे दर्शन घडवले होते.
संघ, जनसंघ आणि भाजपाच्या राजकारणाचा उदारमतवादी चेहरा म्हणून वाजपेयींकडे नेहमी पाहिले गेले. एकीकडे आपल्या मातृसंस्थांचे उग्र हिंदुत्व आणि दुसरीकडे आपले मृदू व्यक्तीत्व यांचा उत्तम मिलाफ अटलजींनी स्वतःच्या स्वभावात साधला होता. वाजपेयी हे भाजपाचे नेते आणि  कार्यकर्त्यासाठी नेहमीच प्रेरणास्थान राहिले. त्यांचे नेतृत्व पक्ष आणि कार्यकर्त्यांना वटवृक्षाच्या छायेप्रमाणे वाटे. मात्र याच वाजपेयींनी वेळप्रसंगी आपल्या पक्षातील नेत्यांना खडेबोल सुनावण्यास मागेपुढे पाहिले नव्हते. 1990 च्या सुमारास अडवाणींची रथयात्रा ऐन भारात असताना "तुम्ही रामाच्या अयोध्येस जात आहात, रावणाच्या लंकेला नाही," असे  वाजपेयीनी सुनावले होते. पुढे 2002 साली गुजरात दंगलीमुळे पक्ष आणि सरकारची नाचक्की झाली असताना वाजपेयींनी आताचे पंतप्रधान आणि तेव्हाचे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना राजधर्माचे पालन करण्याचा सल्ला सर्वासमक्ष दिला होता.

1959 साली प्रथमच संसदेत निवडून गेलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांनी सुरुवातीपासूनच आपल्या वक्तृत्वाची छाप संसदेत पाडली होती. पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असतानाही अटलजींनी सरकारच्या धोरणांबाबत संसदेत रोखठोक मते मांडली होती. तेव्हा त्यांच्या वक्तृत्वावर खुद्द नेहरूही प्रभावीत झाले होते. 1971 च्या युद्धात इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारताने पाकिस्तानचा पाडाव केल्यावर अटलजींनी इंदिराजींना दुर्गेची उपमा दिली. मात्र याच इंदिरा गांधींनी आणीबाणी लादल्यावर त्या निर्णयाला कडाडून विरोध करणाऱ्या नेत्यांमध्ये अटलबिहारी वाजपेयी आघाडीवर होते. त्यावेळी अटलजींनी इंदिरा गांधींवर कठोर शब्दात टीका करण्यास मागेपुढे पाहिले नाही.
त्याकाळी भाजपाचे राजकारण आणि विचारसरणी हे टीकेचा विषय ठरत असत. कधीकधी लोकसभेत मिळालेल्या दोन जागांवरून खिल्ली उडवली जाई. मग या सर्वाला वाजपेयी आपल्या शैलीत उत्तर देत. 1996 आणि 1998 साली त्यांच्या सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावेळी त्यांनी केलेल्या भाषणांचे उदाहरण दिले जाते. 
"सत्ता का खेल चलता रहेगा!
सरकारे आएंगी जाएंगी!
पार्टीयां बनेंगी बिगडेंगी!
पर ये देश रहना चाहिए!
इस देश का लोकतंत्र अमर रहना चाहीए!" या त्यांच्या उद्गारांचे उदाहरण आजही दिले जाते.
त्यावेळी वाजपेयींचे सरकार पडले. पण त्यानंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत अटलजींनी आपल्या पक्षाला विजय मिळवून दिला.
केवळ पक्षीय राजकारणातच नाही तर पंतप्रधानपदाची धुरा सांभाळल्यावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वाजपेयींनी आपल्या कणखरतेचे दर्शन घडवले होते. 1998 साली भारताने केलेली अणुचाचणी हे त्याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणावे लागेल. त्याकाळी वाजपेयींनी दाखवलेल्या दृढनिश्चयामुळेच  अमेरिकेच्या नाकावर टिच्चून भारत अण्वस्त्रसज्ज बनला. एवढंच नाहीतर अण्वस्त्र चाचणीनंतर लादण्यात आलेल्या निर्बंधातून मार्ग काढणे वाजपेयींच्या धोरणामुळेच शक्य झाले होते.
आपला शेजारी आणि पक्का वैरी असलेल्या पाकिस्तानबाबतच्या वाजपेयींच्या धोरणामध्ये या दोन्ही पैलूंचा अंतर्भाव आढळतो. 1999 साली पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे करून वाजपेयी स्वतः लाहोरला गेले. पण त्यांची पावले दिल्लीला माघारी फिरण्यापूर्वीच कारगीलमध्ये घुसखोरी करून पाकिस्तानने भारताला मैत्रीचे रिटर्न गिफ्ट दिले. मग अटलजींनी कणखर बाणा दाखवत कारगीलच्या रणभूमीवर पाकिस्तानला धूळ चारली. या युद्धात केवळ रणभूमीवरच नाही तर मुत्सद्देगिरीमध्येही पाकिस्तानला चीत केले. कारगीलचा संघर्ष पेटलेला असताना अमेरिकेने भारत आणि पाकिस्तानमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव देत वाजपेयींना अमेरिका भेटीचे निमंत्रण दिले. तेव्हा वाजपेयींनी बाणेदारपणे अमेरिकेचा प्रस्ताव धुडकावला. कारगिलमध्ये भारताचा विजय झाला. व्यक्तिमत्त्वात साधेपणा असला तरी हा साधेपणा आपला दुबळेपणा बनणार नाही याची खबरदारी वाजपेयींनी राजकारणात सक्रिय असेपर्यंत घेतली.

Web Title: Atal Bihari Vajpayee: atal bihari vajpayee soft and hard corner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.