लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर १८ दिवसांची ऐतिहासिक यात्रा यशस्वी पूर्ण केलेले भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला रविवारी (दि. १७) सुमारे एक वर्षांनंतर अमेरिकेतून भारतात परतत आहेत. मायदेशी परतल्यावर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील. नंतर आपले मूळ गाव असलेल्या लखनऊला जातील, आता २०२७ मध्ये नियोजित 'इस्रो'ची मानवी अंतराळ मोहीम हे शुभांशू यांचे लक्ष्य असेल अंतराळ स्थानकावर वास्तव्यादरम्यान आलेला अनुभव आणि यानातून प्रवासादरम्यानचे शुभांशूचे अनुभव या मोहिमेत उपयोगी ठरणार आहेत.
अमेरिकेतून निघाल्यावर शुभांशु यांनी सोशल मीडियावर आपले विमानात बसलेले छायाचित्र शेअर केले. २२-२३ रोजी दिल्लीत राष्ट्रीय अंतराळ दिन समारंभ होत आहे. यात शुभांशू सहभागी होतील.
ह्युस्टनमध्ये साजरा केला स्वातंत्र्य दिन
शुभांशू ऐनवेळी अंतराळात जाऊ शकले नाहीत तर त्यांच्याऐवजी सज्ज असलेले प्रशांत नायर या दोघांनी ह्युस्टनमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित समारंभात सहभाग घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणातही शुभांशू यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला होता.