चंद्रशेखर बर्वे -
नवी दिल्ली : माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुजारी - ग्रंथी यांना मानधन देण्याची घोषणा केल्यानंतर सत्ताधारी आम आदमी पक्ष आणि भाजपात शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे.
देशाची राजधानी दिल्ली आम आदमी पक्ष आणि भाजपसाठी कुरुक्षेत्राचे मैदान बनले आहे. विधानसभा निवडणुकीची घोषणा अद्याप झालेली नाही. दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांना डिवचण्याची संधी सोडत नाहीत. आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी पुजारी - ग्रंथी यांना मानधन देण्याची घोषणा केली. भाजपने यास चोख प्रत्युत्तर देत केजरीवाल यांना ‘इलेक्शन हिंदू’ सांगून हिणवले आहे.दिल्लीत आता पोस्टरवॉर सुरू झाले आहे. भाजपने मंगळवारी पोस्टर जारी करून केजरीवाल यांच्यावर शरसंधान साधले.
भाजपच्या दिल्ली शाखेने ‘एक्स’वर जारी केलेल्या पोस्टरमध्ये केजरीवाल यांना रुद्राक्ष आणि फुलांची माळ घालून दाखविण्यात आले आहे. डोक्यावर ‘चुनावी हिंदू’ लिहिले आहे. ‘मंदिरात जाणे आणि पुजाऱ्यांचा आदर केवळ एक देखावा आहे’, असेही लिहिले आहे. दुसरीकडे, केजरीवाल यांनीसुद्धा भाजपवर हल्ला चढविला आहे. ‘भाजपमध्ये हिंमत असेल, तर त्यांनी माझे हे आव्हान स्वीकारावे. २० राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे. त्या सर्व राज्यांमध्ये पुजारी आणि ग्रंथी यांना मानधन देण्याची घोषणा करून दाखवा’, असे आव्हान देऊन केजरीवाल यांनी भाजपवर दबावाचा प्रयत्न केला आहे.
हनुमान मंदिरातून योजनेच्या नोंदणीला सुरुवातदिल्लीत आपचे सरकार आले, तर पुजारी आणि ग्रंथी यांना १८ हजार रुपये मानधन देऊ, अशी घोषणा केजरीवाल यांनी सोमवारी केली होती. कॅनॉट प्लेसमधील हनुमान मंदिरातून या योजनेच्या नोंदणीला मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. भाजप संजीवनी योजना बंद करण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोपही केजरीवाल यांनी केला आहे.
राजकारणासाठी मुलांचा वापर : भाजप- आपचे नेते अरविंद केजरीवाल हे राजकीय लाभासाठी मुलांचा वापर करत असून, हे गलिच्छ राजकारण आहे, अशी टीका भाजपने मंगळवारी केली. - भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी सांगितले की, सत्ताधारी पक्षाने सोशल मीडियावरील पोस्ट काढलेली नाही, ज्यात काही मुले केजरीवाल यांच्या समर्थनार्थ घोषणा देत आहेत. - या प्रकरणावर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने चिंता व्यक्त केली आहे.