हरीश गुप्तानवी दिल्ली : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल रविवारी हाती येणार असून, अनेक राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की, मे २०२४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच्या या सेमीफायनल असतील. या पाच राज्यांत लोकसभेच्या ८३ जागा आहेत आणि या राज्यांमध्ये विजय मिळवणाऱ्यास पुढे विजय मिळवता येऊ शकतो. तथापि, या राज्यांतील भूतकाळातील विधानसभा निवडणुकांवर नजर टाकल्यास हा अंदाज नाकारला जाऊ शकतो.
विधानसभेत पराभव मात्र, लाेकसभेत विजयभाजपचा २०१८ मध्ये राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगडसह पाच वर्षे सत्तेत असलेल्या सर्व पाच राज्यांत पराभव झाला होता. तरीही त्यानंतर सहा महिन्यांनी झालेल्या लोकसभा निवडणुकीत यापैकी तीन राज्यांनी भाजपला लक्षणीय विजय मिळवून दिला होता. भाजपने तीन राज्यांत ६५ पैकी ६१ जागा जिंकल्या होत्या आणि तेलंगणात १७ पैकी चार जागा जिंकून खाते उघडले होते. मिझोराममधील एकमेव लोकसभेची जागा प्रादेशिक पक्षाकडे गेली होती. हा पक्ष नंतर एनडीएमध्ये सहभागी झाला होता.
२० वर्षांपूर्वी काय घडले हाेते?२००३ मध्येही भाजपने राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुका जिंकल्या होत्या. परंतु, २००४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखालील पक्षाचा पराभव झाला. २००८ मध्ये भाजपने मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये भाजपने पुन्हा विजय मिळवला होता. परंतु, २००९ मध्ये काँग्रेसला नामोहरम करण्यात अपयश आले.
काँग्रेससाठी हे महत्त्वाचे...पाच विधानसभांच्या निवडणुकांची बाब वगळता २०२४ मध्ये काँग्रेससाठी दोन घटक चांगले काम करू शकतात. एक म्हणजे मल्लिकार्जुन खरगे यांची काँग्रेस अध्यक्षपदी निवड आणि दुसरे म्हणजे भारत जोडो यात्रेनंतर ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्या आलेखात झालेली लक्षणीय सुधारणा. खरगे दलित समाजातील असल्यामुळे भाजप त्यांच्यावर वैयक्तिक हल्लाबोल करण्याचे टाळत आहे व अत्यंत सावध पावले टाकत आहे. त्यांची ज्येष्ठता लक्षात घेऊन इंडिया आघाडीचे सहकारी पक्षही त्यांचा आदर करताना दिसतात. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदींना २०१९च्या निवडणुकीच्या शेवटच्या आठवड्याप्रमाणे निवडणूक कशी वळवायची, हे माहिती आहे.