Assembly Election 2026: भारतीय निवडणूक आयोगाने आज देशातील पाच राज्यांसाठी विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुडुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे, या मोठ्या निवडणुकांसोबतच महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी या दोन महत्त्वाच्या विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीची घोषणाही करण्यात आली आहे.
पाच राज्यांचे कुठे आणि कधी मतदान?
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, बहुतांश राज्यांमध्ये एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. आसाम, केरळ आणि पुडुचेरी या तिन्ही राज्यांमध्ये ९ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान होईल. तामिळनाडूमध्ये २३ एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. तर पश्चिम बंगालमध्ये राजकीय संघर्ष पाहता दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. पहिला टप्पा २३ एप्रिल तर दुसरा टप्पा २९ एप्रिल रोजी पार पडेल. सर्व पाचही राज्ये आणि महाराष्ट्रातील पोटनिवडणुकांचे निकाल ४ मे २०२६ रोजी जाहीर होतील.
महाराष्ट्राचे लक्ष; बारामती आणि राहुरीसाठी मतदान
महाराष्ट्रातील दोन दिग्गज नेत्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागांसाठी निवडणूक आयोगाने तारखा निश्चित केल्या आहेत. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी विमान अपघातात अकाली निधन झाले होते. त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभेसाठी आता २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर अहिल्यानगरमधील राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजी कर्डिले यांचे ऑक्टोबर २०२५ मध्ये निधन झाले होते. या जागेसाठीही बारामतीसोबतच २३ एप्रिलला मतदान होईल.
निवडणुका बिनविरोध होणार?
बारामती आणि राहुरी या दोन्ही जागांवर संबंधित नेत्यांच्या निधनामुळे सहानुभूतीची लाट आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात या दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात, अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र, राजकीय पक्ष काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Web Summary : Assembly elections announced for five states. Baramati and Rahuri by-elections declared following the deaths of key leaders. Polling for all elections on April 23rd, results on May 4th, 2026. Political circles discuss possibility of unopposed elections.
Web Summary : पांच राज्यों के विधानसभा चुनावों की घोषणा। बारामती, राहुरी में उपचुनाव, प्रमुख नेताओं के निधन के बाद। 23 अप्रैल को मतदान, 4 मई, 2026 को परिणाम। राजनीतिक गलियारों में निर्विरोध चुनाव की संभावना पर चर्चा।