आसाममध्ये महिलेला खांबाला बांधून मारहाण, मुले पळविणारी असल्याचा संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 23:55 IST2018-06-30T23:55:14+5:302018-06-30T23:55:18+5:30
मुले पळविणारी महिला असल्याच्या संशयावरून एका महिलेला ग्रामस्थांनी खांबाला बांधून मारहाण केल्याची घटना आसामच्या सोनीतपूर जिल्ह्यात घडली. अर्थात, अन्य काही ग्रामस्थांच्या मध्यस्थीनंतर ही मारहाण थांबली आणि पोलिसांना बोलविण्यात आले.

आसाममध्ये महिलेला खांबाला बांधून मारहाण, मुले पळविणारी असल्याचा संशय
गुवाहाटी : मुले पळविणारी महिला असल्याच्या संशयावरून एका महिलेला ग्रामस्थांनी खांबाला बांधून मारहाण केल्याची घटना आसामच्या सोनीतपूर जिल्ह्यात घडली. अर्थात, अन्य काही ग्रामस्थांच्या मध्यस्थीनंतर ही मारहाण थांबली आणि पोलिसांना बोलविण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून आसाम व त्रिपुरात गुले पळविणाऱ्या टोळीच्या अफवा पसरत असून, त्यामुळे केवळ संशयावरून अनेकांना मारहाण होत आहे. काही दिवसांपूर्वी यावरून झालेल्या मारहाणीत एक व्यक्ती मरण पावली. त्रिपुरामध्ये आठवडाभरात लोकांनी संशयावरून चार जणांना ठेचून मारले, तर तीन जणांना प्रचंड मारहाण केली. ते तिघे उपचार घेत आहेत. त्रिपुरामध्ये तर अफवांवर विश्वास ठेवू नका, असा प्रचार करणाºया सरकारी कर्मचाºयालाच बेदम चोप दिला. तो गुरुवारी मरण पावला. आसाममधील सोनीतपूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक नुमल महाट्टा म्हणाले की, शुक्रवारी रात्री आम्हाला फोन आला की, कटानी ग्रामस्थांनी एका संशयित महिलेला पकडले आहे. तिथे जाताच पोलिसांना समजले की ती बोलू शकत नव्हती. कदाचित त्यामुळेच ग्रामस्थांना तिच्याबाबत संशय आला असावा. (वृत्तसंस्था)
गुन्हा दाखल नाही
ही महिला बाहेरगावची आहे. अफवा पसरल्या आणि लोक घाबरले. त्यातूनच हा हल्ला झाला. ही महिला बिहारची अथवा स्थानिक आदिवासी असावी, असा अंदाज आहे. दरम्यान, महिलेला उपचारासाठी तेजपूर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले आहे. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.