आसामात एसपीओंचे सशस्त्र बंड, ५ जखमी
By Admin | Updated: June 7, 2015 22:50 IST2015-06-07T22:50:04+5:302015-06-07T22:50:04+5:30
आसाममधील विशेष पोलीस अधिकाऱ्यांनी (एसपीओ) नोकरीत कायम करण्याच्या आपल्या मागणीसाठी शनिवारी सशस्त्र बंड पुकारले.

आसामात एसपीओंचे सशस्त्र बंड, ५ जखमी
गुवाहाटी : आसाममधील विशेष पोलीस अधिकाऱ्यांनी (एसपीओ) नोकरीत कायम करण्याच्या आपल्या मागणीसाठी शनिवारी सशस्त्र बंड पुकारले. या दरम्यान उडालेल्या संघर्षात पाच जण जखमी झाले. त्यापैकी दोघे गोळीबारात जखमी झाले आहेत.
जवळपास ८४० एसपीओ जवानांनी शनिवारी दिमा हासाओ, लुमडिंग, कोक्राझार, चिरांग, बक्सा, बारपेटा, मोरीगाव, नागाव आणि होजाईसह अन्य शहरांमधून गुवाहाटीच्या दिशेने कूच केले होते. दिमा हासाओ हे या आंदोलनाचे केंद्र बनले होते. तेथून सर्वाधिक ३४० जवान विविध वाहनांमधून गुवाहाटीला निघाले होते. या जवानांना शनिवारी रात्री गुवाहाटीच्या सीमेवर रोखण्यात आले. येथून पुढे जाऊ नका आणि आपली शस्त्रे खाली ठेवा, असा सल्ला त्यांना पोलिसांकडून देण्यात आला. परंतु जवानांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. या दरम्यान संघर्ष उडाला, ज्यात पाच जण जखमी झाले.
एसपीओ हिंसक बनल्यानंतर गोळीबार करण्याशिवाय पर्यायच उरला नव्हता. गोळीबारात दोन एसपीओ जखमी झाले, तर संघर्षात अन्य तिघे जखमी झाले, अशी माहिती पोलीस महानिरीक्षक एस. एन. सिंग यांनी दिली.
हा सरकारविरुद्धचा नियोजित सशस्त्र उठावच होता आणि राज्यातील सर्व ८४० एसपीओंना तात्काळ बडतर्फ करण्यात आले आहे, असे सिंग यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)