राजधानीत मोदींच्या नावावरच मते मागणार
By Admin | Updated: November 5, 2014 00:55 IST2014-11-05T00:55:08+5:302014-11-05T00:55:08+5:30
हरियाणा आणि महाराष्ट्राच्या धर्तीवर दिल्लीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच ‘नाम आणि काम’ पुढे करून विधानसभा निवडणुकांना सामोरे जाण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे़

राजधानीत मोदींच्या नावावरच मते मागणार
जयशंकर गुप्त, नवी दिल्ली
हरियाणा आणि महाराष्ट्राच्या धर्तीवर दिल्लीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच ‘नाम आणि काम’ पुढे करून विधानसभा निवडणुकांना सामोरे जाण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे़ त्यामुळे निवडणूकपूर्व दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करण्याचे भाजपा टाळणार आहे़
दिल्लीत भाजपा नेत्यांसोबत केंद्रीय नेतृत्वाची बैठक पार पडली़ या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, कुठल्याही नेत्यास भावी मुख्यमंत्री घोषित करण्यापेक्षा ‘चलो, मोदीजी के साथ चले’ हाच नारा घेऊन निवडणूक मैदानात उतरणे अधिक फायदेशीर असल्याचा एकसूर या बैठकीत ऐकू आला़
बैठकीनंतर दिल्लीसाठी भाजपाचे प्रभारी प्रभात झा यांनी पत्रकारांना या निर्णयाची माहिती दिली़ भाजपा विकासाच्या मुद्यावर दिल्ली विधानसभा निवडणूक लढेल आणि मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार निवडणुकीनंतर ठरेल, असे त्यांनी सांगितले़
प्रदेश भाजपा अध्यक्ष सतीश उपाध्याय यांनीही पक्ष सामूहिक नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार असल्याची स्पष्टोक्ती दिली़ गत डिसेंबरमधील दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाने डॉ़ हर्षवर्धन यांना भावी मुख्यमंत्री म्हणून समोर केले होते़ ते सध्या केंद्रात आरोग्यमंत्री आहेत़
दुसरीकडे आम आदमी पार्टी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नावावर मतांचा जोगवा मागणार आहे़ विधानसभा बरखास्त करून नव्याने निवडणूक घेण्याचा निर्णय हा दिल्लीकरांचा विजय असल्याचे आम आदमी पार्टीने म्हटले आहे़ आपला पक्ष या निवडणुकीत बहुमताने विजयी होईल,असा दावा केजरीवाल यांनी केला आहे़
गतवेळी तत्कालीन मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवून दारुण पराभव सहन करावा लागलेल्या काँग्रेसनेही यावेळी भावी मुख्यमंत्र्याचे नाव गुलदस्त्यात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे़