शहीद हंगपन दादा यांना मरणोत्तर अशोक चक्र
By Admin | Updated: January 28, 2017 00:58 IST2017-01-28T00:58:39+5:302017-01-28T00:58:39+5:30
काश्मीरमध्ये चकमकीत तीन दहशतवाद्यांशी एकट्याने मुकाबला करून त्यांना कंठस्नान घालणारे राष्ट्रीय रायफल्सचे शहीद हवालदार हंगपन दादा

शहीद हंगपन दादा यांना मरणोत्तर अशोक चक्र
नवी दिल्ली : काश्मीरमध्ये चकमकीत तीन दहशतवाद्यांशी एकट्याने मुकाबला करून त्यांना कंठस्नान घालणारे राष्ट्रीय रायफल्सचे शहीद हवालदार हंगपन दादा यांना मरणोत्तर अशोक चक्र पुरस्काराने गौरविण्यात आले. ६८ व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात गुरुवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या पत्नी चासेन लोवांग दादा यांना हा पुरस्कार प्रदान केला. अशोक चक्र हा शांततेच्या काळात दिला जाणारा सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे.
मूळ अरुणाचल प्रदेशच्या असणाऱ्या हंगपन दादा यांनी काश्मीरच्या हिमाच्छादित पर्वतराजीत (१३ हजार फूट उंचीवर) लपून बसलेल्या तीन घुसखोरांचा मुकाबला करून त्यांचा एकट्याने खात्मा केला होता. तथापि, या चकमकीत त्यांना आपला प्राण गमवावा लागला. अरुणाचल प्रदेशच्या बोदुरिया गावातील मूळ रहिवासी हवालदार हंगपन यांना त्यांचे सहकारी प्रेमाने दादा अशी हाक मारत.
दादा १९९७ मध्ये लष्कराच्या आसाम रेजिमेंटद्वारे लष्करात सहभागी झाले होते. नंतर त्यांची ३५ राष्ट्रीय रायफल्समध्ये नेमणूक करण्यात आली. त्यांना गेल्यावर्षीच उंच पर्वतराजीत तैनात करण्यात आले होते. शहीद हंगपन दादा यांच्या पत्नी चासेंग लोवांग दादा यावेळी म्हणाल्या की, मी आज खूप दु:खी आणि खूप आनंदीही आहे. त्यांनी देशासाठी प्राणाचे बलिदान दिले. इतरांनीही त्यांच्याप्रमाणे लष्करात सहभागी झाले पाहिजे. (लोकमत न्यूज नेटवर्क)