Asaduddin Owaisi on Malegaon blast case verdict: मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयाने २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व सात आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. न्यायालयाने म्हटले की, आरोप सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे नाहीत. या निर्णयावर AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी तपासाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि सहा जणांच्या मृत्यूला कोण जबाबदार आहे? असा प्रश्न विचारला.
ओवेसी यांचा सरकारवर हल्लाबोल
ओवेसींनी या निकालाला "निराशाजनक" म्हटले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर केलेल्या पोस्टमध्ये ते म्हणतात, "६ नमाजींचा मृत्यू झाला, १०० जखमी झाले. धर्मामुळे त्यांना लक्ष्य करण्यात आले. जाणूनबुजून चुकीचा तपास केला, ज्यामुळे आरोपींना निर्दोष सोडण्यात आले. १७ वर्षांनंतरही न्याय मिळालेला नाही. ६ जणांना कोणी मारले? महाराष्ट्रातील 'धर्मनिरपेक्ष' पक्ष जाब का विचारत नाहीत? मुंबईतील ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणाप्रमाणे सरकार या प्रकरणातील निकाला आव्हान देईल का? " असा प्रश्न त्यांनी विचारला.
राजकीय हस्तक्षेपाचे आरोप
ओवेसींनी तपासात राजकीय हस्तक्षेपाचाही आरोप केला. त्यांनी २०१६ मध्ये सरकारी वकील रोहिणी सालियन यांच्या विधानाचा संदर्भ दिला, ज्यांनी म्हटले होते की, एनआयएने त्यांना आरोपींबद्दल "सौम्य" दृष्टिकोन बाळगण्यास सांगितले होते. ओवेसी म्हणाले की, "२०१७ मध्ये एनआयएने प्रज्ञा ठाकूर यांना निर्दोष सोडण्याचा प्रयत्न केला, ज्या नंतर २०१९ मध्ये भाजप खासदार झाल्या," अशी टीकाही त्यांनी केली.