पश्चिम बंगाल शिक्षक भरती घोटाळ्यावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील २५,७५३ शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या होत्या. शिक्षक भरतीच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जोरदार टीका केली.
"मी जिवंत असेपर्यंत कोणताही शिक्षक आपली नोकरी गमावणार नाही" असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. तसेच कोणत्याही किंमतीत शिक्षकांच्या नोकऱ्या वाचवण्यासाठी वचनबद्ध आहेत असंही सांगितलं. "सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाने माझं मन खूप दुःखी आहे. मला माहीत आहे की जर मी यावर बोलले तर मला जेलमध्येही जावं लागू शकतं, पण तरीही मी बोलेन. जर कोणी मला आव्हान दिलं तर त्याला कसं उत्तर द्यायचं हे मला माहित आहे" असं ममता यांनी म्हटलं आहे.
"कोण पात्र आहे आणि कोण नाही हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट करावं. आम्हाला एक यादी द्या. शिक्षण व्यवस्था नष्ट करण्याचा अधिकार कोणालाही नाही" असंही सांगितलं. ममता यांनी एक उदाहरण दिलं आणि म्हणाल्या की, NEET परीक्षेतही अनेक आरोप झाले होते, परंतु सर्वोच्च न्यायालयाने ते रद्द केले नाही. बंगालला का लक्ष्य केलं जात आहे? लोक बंगालच्या प्रतिभेला घाबरतात का? असा सवालही विचारला.
ममता बॅनर्जी यांचे हे विधान राज्यातील शिक्षकांसाठी एक मोठा संदेश आहे. शिक्षण क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी त्या पूर्णपणे तयार आहेत आणि कोणत्याही परिस्थितीत पात्र शिक्षकांच्या हक्कांचे रक्षण करतील असं सांगत त्यांनी राज्यातील शिक्षकांच्या हक्कांसाठी एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे आणि त्यांचा संघर्ष केवळ एका राज्यासाठी नसून संपूर्ण शिक्षण व्यवस्थेच्या संरक्षणासाठी आहे हे स्पष्ट केलं आहे.