अरुणाचलच्या विद्यार्थ्यावरील हल्ला निंदनीय : किरण रिजीजू
By Admin | Updated: March 14, 2017 00:26 IST2017-03-14T00:26:40+5:302017-03-14T00:26:40+5:30
बंगलोरमध्ये अरुणाचल प्रदेशमधील विद्यार्थ्यावर झालेला हल्ला निंदनीय असून, याची केंद्रीय गृहखात्याकडून स्वतंत्रपणे चौकशी करण्यात येईल

अरुणाचलच्या विद्यार्थ्यावरील हल्ला निंदनीय : किरण रिजीजू
नवी दिल्ली : बंगलोरमध्ये अरुणाचल प्रदेशमधील विद्यार्थ्यावर झालेला हल्ला निंदनीय असून, याची केंद्रीय गृहखात्याकडून स्वतंत्रपणे चौकशी करण्यात येईल, असे केंद्रीय गृह राज्यमंत्री किरण रिजीजू यांनी म्हटले आहे. आम्ही जगभरातील भारतीयांच्या सुरक्षेबाबत बोलत असतो; तेव्हा आपल्याच देशात घडणाऱ्या अशा घटना आपणाला लज्जास्पद आहेत, असेही रिजीजू म्हणाले.
कर्नाटकची राजधानी बंगलोर शहरात ६ मार्च रोजी ही घटना घडली असून, ख्रिस्त विद्यापीठात चौथ्या वर्षाला शिकणाऱ्या हिगिओ गुंटेय या विद्यार्थ्याला त्याच्या घरमालकाने बेदम मारहाण केली होती. इतकेच नाही तर त्याला आपले बूटही चाटायला लावले होते. घरातील पाण्याचा जास्त वापर केल्याच्या शुल्लक कारणावरून हेमंतकुमार या घरमालकाने हे निंदनीय कृत्य केले होते. याप्रकरणी हेमंतकुमार याच्या विरोधात गुंटेयने ९ मार्च रोजी तक्रार दाखल केली आहे.