पठाणकोटमधून आयएसआयच्या हस्तकाला अटक
By Admin | Updated: February 2, 2016 14:05 IST2016-02-02T14:05:02+5:302016-02-02T14:05:02+5:30
पठाणकोट येथील लष्करी परिसरातून पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयसाठी काम करणा-या एका संशयिताला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे.

पठाणकोटमधून आयएसआयच्या हस्तकाला अटक
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २ - पठाणकोट येथील लष्करी परिसरातून पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयसाठी काम करणा-या एका संशयिताला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. इरशाद अहमद असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, तो भारतीय आहे. इरशादने इथे कामगार म्हणून प्रवेश मिळवला होता.
जैश-ए-मोहम्मदच्या अतिरेक्यांनी मागच्या महिन्यात हल्ला केलेल्या जागांची, संवेदनशील उपकरणांची तो त्याच्या स्मार्टफोनवर छायाचित्रे काढून जम्मूतील सज्जादला पाठवत होता. शस्त्रास्त्र प्रकरणात सज्जादला नुकतीच जम्मूमध्ये अटक झाली आहे. इरशादने केलेल्या खुलाशाच्या आधारावर सज्जादची चौकशी सुरु आहे.
गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर इरशादला पंजाब पोलिसांनी अटक केली. गुप्तचर यंत्रणांना त्याच्या मोबाईलमधून संवेदनशील ठिकाणांची छायाचित्रे मिळाली आहेत. पठाणकोटमध्ये भारतीय लष्कराचा सर्वात मोठा आणि संवेदनशील तळ आहे.