प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यामुळे बिहारमधील अनेक स्थानकांवर मोठी गर्दी दिसून येत आहे. याच दरम्यान आरा स्टेशनवरून एक व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये संपूर्ण क्रांती ट्रेनची तोडफोड होत असल्याचं दिसून येतं. एसी कोचची काचही फुटली. मिळालेल्या माहितीनुसार, आरा स्टेशनवर प्रचंड गर्दीमुळे तिकीट असलेले प्रवासी ट्रेनमध्ये चढू शकले नाहीत. कारण ट्रेनमध्ये आधीच प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आतून दरवाजे बंद केले होते.
संपूर्ण क्रांती ट्रेन आरा येथे २ मिनिटं थांबते. जेव्हा ट्रेन थांबली तेव्हा आत आधीच बसलेल्या प्रवाशांनी ट्रेनचे दरवाजा बंद केले होते. यामुळे ज्या प्रवाशांकडे तिकीट होते त्यांना ट्रेनमध्ये चढता आलं नाही. अशा परिस्थितीत काही प्रवाशांकडून ट्रेनची तोडफोड करण्यात आली.
ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी आणि तोडफोडीचा व्हिडीओ समोर आल्यानंतर, दानापूर रेल्वे विभागाचे डीआरएम जयंत कुमार चौधरी आरा स्टेशनवर पोहोचले. त्यांनी प्लॅटफॉर्म क्रमांक तीनची पाहणी केली. यानंतर त्यांनी सांगितलं की, प्रवाशांची सुरक्षा रेल्वेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. यासाठी जर गाड्यांच्या थांब्याचा वेळ वाढवायचा असेल तर तो वाढवावा. त्यांनी आरपीएफ आणि व्यावसायिक कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचे निर्देश दिले आणि सांगितले की जर प्रवाशांना ट्रेनमध्ये जागा मिळत नसतील तर त्यांना त्यानंतर येणाऱ्या ट्रेनमध्ये बसण्याची परवानगी द्यावी.
या प्रकरणात, आरपीएफ निरीक्षक सुमन कुमारी यांनी सांगितलं की, रविवारी कुंभमेळ्याला जाण्यासाठी आरा येथून एक विशेष ट्रेन निघणार होती. त्याची नियोजित वेळ संध्याकाळी ७ वाजता आहे. पण ती ट्रेन रात्री ८:२० वाजता निघाली. डीआरएमने म्हटलं आहे की, जेव्हा जेव्हा कोणतीही ट्रेन येते तेव्हा प्रवाशांचे हित लक्षात घेऊन, गरज पडल्यास ती आणखी १० ते १५ मिनिटं थांबवावी.
बिहारहून पश्चिमेकडे जाणाऱ्या गाड्या अजूनही हाऊसफुल्ल आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून प्रयागराजला जाण्यासाठी आरा रेल्वे स्थानकावर लोकांची मोठी गर्दी जमत आहे. परिस्थिती अशी आहे की, गाड्यांमध्ये गर्दी जास्त असल्याने लोकांना चढताना आणि उतरताना खूप अडचणी येत आहेत.