भारतीय सीमा रेषेवर दहशतवाद्यांशी लढणार रोबोट
By वैभव देसाई | Updated: August 11, 2017 22:41 IST2017-08-11T21:39:54+5:302017-08-11T22:41:00+5:30
लष्करानंही एक जालीम उपाय शोधलाय. भारतीय लष्कर दहशतवाद्यांचा सामना करण्यासाठी नियंत्रण रेषेवर लवकरच रोबोट तैनात करणार आहे.

भारतीय सीमा रेषेवर दहशतवाद्यांशी लढणार रोबोट
नवी दिल्ली, दि. 11 - गेल्या काही वर्षांपासून काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेपलिकडून होणा-या दहशतवादी हल्ल्यात अनेक भारतीय जवान शहीद झालेत. दहशतवाद्यांसह पाकिस्तानी सैन्याचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच चाललाय. त्यावर लष्करानंही एक जालीम उपाय शोधलाय. भारतीय लष्कर दहशतवाद्यांचा सामना करण्यासाठी नियंत्रण रेषेवर लवकरच रोबोट तैनात करणार आहे.
स्वदेशी बनावटीचे हे रोबोट शत्रूवर मात करत लष्कराच्या तळांवर दारूगोळा पोहोचवण्यासही सक्षम असणार आहेत. लष्करानं पहिल्या टप्प्यात 544 रोबोट बनवण्याच्या दिलेल्या प्रस्तावाला संरक्षण मंत्रालयानंही हिरवा कंदील दाखवला आहे. भारतीय नियंत्रण रेषांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं या रोबोट मशिन खूप फायद्याच्या ठरणार आहेत, असं लष्करानं म्हटलं आहे. जंगल परिसर, शहरी भागांसह ग्रामीण भागात लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी लष्कर या रोबोटचा उपयोग करणार आहे. राष्ट्रीय रायफल्स किंवा लष्करी जवान ज्या भागात पोहोचू शकत नाही, अशा ठिकाणी या रोबोटचा वापर करून दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात येणार आहे. या रोबोटमध्ये 200 मीटरपर्यंत पाठत ठेवू शकतील, असे कॅमेरे बसवण्यात येणार असून, ट्रान्समिशन सिस्टमचीही व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच हे रोबोट वजनानं हलके आणि खडबडीत असणार आहेत.
गेल्या काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणा-या इंदोरने यातून मार्ग काढत एक भन्नाट कल्पना अंमलात आणली होती. इंदोरमध्ये चक्क रोबोट वाहतुकीचं नियंत्रण करत असल्याचंही पाहायला मिळालं होतं, यासाठी वाहतूक पोलिसांनी एका खासगी इंजिनिअरिंग कॉलेजशी मदत घेतली होती. पहिल्यांदाच शहरात अशा प्रकारचा प्रयोग करण्यात आला होता. शहरातील व्यस्त ठिकाण असलेल्या रस्त्यावर 14 फुटांचा धातूपासून तयार करण्यात आलेला रोबोट उभारण्यात आलेला आहे. हा रोबोट वाहतुकीवर लक्ष ठेवत असून नियंत्रण करत आहे. वेंकटेश्वर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या दोन प्राध्यापकांनी हा रोबोट तयार केला होता. राहुल तिवारी आणि अनिरुद्ध शर्मा यांनी हा रोबोट तयार केला असून यासाठी तब्बल दोन वर्ष लागली. या प्रोजेक्टसाठी एकूण 15 लाखांचा खर्च आला होता.