सेनाप्रमुखांनी केली होती प्रजासत्ताक दिनाची परेड रद्द करण्याची शिफारस
By Admin | Updated: June 29, 2014 14:47 IST2014-06-29T14:46:55+5:302014-06-29T14:47:04+5:30
प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजपथावर निघणारी परेड हा भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण असला तरी १९७२ मध्ये भारतीय सैन्य मुख्यालयाने प्रजासत्ताक दिनी होणारी परेड रद्द करण्याची शिफारस केली होती.

सेनाप्रमुखांनी केली होती प्रजासत्ताक दिनाची परेड रद्द करण्याची शिफारस
ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २९- प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजपथावर निघणारी परेड हा भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण असला तरी १९७२ मध्ये भारतीय सैन्य मुख्यालयाने प्रजासत्ताक दिनी होणारी परेड रद्द करण्याची शिफारस केली होती. मात्र तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७१ मध्ये पाकविरोधातील युद्धात मिळालेला विजय साजरा करण्यासाठी ही शिफारस मान्य केली नव्हती.
भारतीय सैन्यातील प्रमुख अधिकारी फिल्ड मार्शल माणेकशॉ यांच्यावर आधारित एका पुस्तकात हा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. माणेकशॉ यांचे सहकारी सेवानिवृत्त ब्रिगेडियर बेहराम पांथाकी आणि त्यांची पत्नी जेनोबिया यांनी 'फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ: द मॅन इन हिज टाइम्स' हे पुस्तक लिहीले असून या पुस्तकात त्या काळातील काही महत्त्वपूर्ण माहिती उघड केली आहे. 'पाकिस्तानवर विजय मिळाल्याने भारतीय सैन्यावरील १९६२ मध्ये चीन युद्धात झालेल्या पराभवाचे डाग पुसले गेले होते. भारतीय सैन्याची तुकडी युद्धभूमीत असल्याने सैन्य मुख्यालयाने प्रजासत्ताक दिनीहोणारी परेड रद्द करण्याची शिफारस केली होती. मात्र इंदिरा गांधींना विजयाचा आनंदोत्सव साजरा करायचा होता. तसेच युद्दातील शहीदांना श्रध्दांजली द्यायची होती. त्यामुळे अल्पसूचनेवरच इंडिया गेटजवळ अमर ज्योत प्रज्वलित करण्यात आली होती.' असा उल्लेख या पुस्तकात करण्यात आला आहे. १९७२ मध्ये प्रजासत्ताक दिनी माणेकशॉ यांची डिफेंन्स स्टाफच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्याचा इंदिरा गांधींचा प्रस्ताव होता. मात्र तत्कालीन जगजीवन राम यांनी या प्रस्तावाला विरोध केला होता असा दावाही या पुस्तकात करण्यात आला आहे.
काश्मीरवरुन नेहरु गोंधळले होते
१९४७ मध्ये पाकिस्तानी घुसखोरांनी काश्मीर घाटीच्या दिशेने आगेकूच केली होती. यावर ठोस निर्णय घेताना तत्कालीन पंतप्रधान नेहरु गोंधळले होते. मात्र तत्कालीन गृहमंत्री सरदार पटेल यांनी नेहरुंचे मतपरिवर्तन केले. नेहरुंना काश्मीर प्रश्न संयुक्त राष्ट्राकडे न्यायचा होता. घुसखोरांविरोधात लष्करी कारवाई केली तर अन्य देश त्यावर काय प्रतिक्रिया देतील याविषयी नेहरुंना चिंता होती. यावर पटेल नेहरुंना म्हणाले, तुम्हाला काश्मीर हवा की नको ?. यावर नेहरुंनी काश्मीर हवा असे उत्तर दिले. यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानी घुसखोर दहशतवाद्यांविरोधात कारवाईला सुरुवात केली असा महत्त्वपूर्ण उल्लेखही या पुस्तकात करण्यात आला आहे.