नवी दिल्ली : लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांच्या आरक्षणाचा तक्ता आठ तास आधीच तयार करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. सध्या आरक्षण तक्ता चार तास आधी तयार केला जातो. आरक्षण तक्ता आठ तास आधीच तयार करण्याच्या निर्णयाचा दूरवरच्या प्रवाशांना विशेष फायदा होईल. त्यांना आपल्या प्रवासाचे नियोजन करण्यास अधिक वेळ मिळू शकेल, असे रेल्वेशी संबंधित सूत्रांनी सांगितले.
प्राप्त माहितीनुसार, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या एका आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी रेल्वेमंत्री वैष्णव यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे अधिकारी काम करीत आहेत.
रेल्वे प्रवास आजपासून महागणार : १ जुलैपासून रेल्वेचा प्रवास महागणार आहे. ट्रेनच्या नॉन-एसी प्रवासाचे भाडे प्रति किमी एक पैसे आणि एसी प्रवासासाठीचे भाडे प्रति किमी दोन पैसे वाढेल. ५०० किमीपर्यंतच्या लोकल आणि जनरल सेकंड क्लासच्या भाड्यात कोणताही बदल होणार नाही. ५०० किमीपेक्षा जास्त प्रवासाच्या सेकंड क्लासच्या प्रवासावर प्रति किमी फक्त ०.५ पैशांची वाढ होईल.
प्रति मिनिट १.५ लाख तिकिटांचे बुकिंग होेणार
नवी अद्ययावत ‘प्रवासी आरक्षण प्रणाली’ (पीआरएस) ५ पट अधिक म्हणजेच प्रति मिनिट १.५ लाख तिकिटांचे बुकिंग करण्यास सक्षम आहे. सध्याच्या पीआरएसमध्ये प्रतिमिनिट ३२ हजार तिकिटांचेच बुकिंग होऊ शकते. नव्या पीआरएसमध्ये अनेक भाषांची सोय आहे. तसेच ती वापरण्यास सोपी आहे. यात दिव्यांग, विद्यार्थी आणि रुग्ण यांच्यासाठी स्वतंत्र सुविधा आहे.
१ जुलै २०२५ पासून आयआरसीटीसीची वेबसाइट व मोबाइल ॲपवर केवळ पडताळणी झालेल्या (ऑथेन्टिकेटेड) वापरकर्त्यांनाच तत्काळ तिकिटांचे बुकिंग करता येणार आहे.