दिल्ली विधानसभा विसर्जित करण्यास मंजुरी
By Admin | Updated: November 5, 2014 01:00 IST2014-11-05T01:00:30+5:302014-11-05T01:00:30+5:30
यामुळे दिल्लीत नव्याने निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला असून येत्या जानेवारी वा फेबु्रवारीत विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे़

दिल्ली विधानसभा विसर्जित करण्यास मंजुरी
नवी दिल्ली : आम आदमी पार्टी सरकारने राजीनामा दिल्यानंतर गत आठ महिन्यांपासूनची राजकीय अनिश्चितता संपुष्टात आणत, दिल्ली विधानसभा विसर्जित करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली़ यामुळे दिल्लीत नव्याने निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला असून येत्या जानेवारी वा फेबु्रवारीत विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे़
सर्वोच्च न्यायालयाचा हस्तक्षेप आणि बिगर भाजपा पक्षांनी घेतलेल्या कठोर भूमिकेनंतर दिल्लीत विधानसभा निवडणुका घेण्याशिवाय नायब राज्यपाल नजीब जंग यांच्याकडे अन्य कोणताही पर्याय उरलेला नव्हता़ त्यानुसार, जंग यांनी काल सोमवारी दिल्ली विधानसभा बरखास्त करण्याची शिफारस राष्ट्रपतींकडे केली होती़ राष्ट्रपतींनी ही शिफारस मान्य करून संबंधित प्रस्ताव केंद्राकडे पाठवला होता़ या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संक्षिप्त बैठकीत, दिल्ली विधानसभा बरखास्त करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली़ या बैठकीनंतर एका वरिष्ठ मंत्र्याने सांगितले की, केंद्रीय मंत्रिमंडळाने दिल्ली विधानसभा तात्काळ प्रभावाने बरखास्त करण्याची शिफारस केली आहे़
अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने राजीनामा दिल्यानंतर गत १७ फेबु्रवारीपासून दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू आहे़ यादरम्यान भाजपाने सरकार स्थापनेची समीकरणे जुळवून बघितली़ मात्र बहुमताचा जादुई आकडा गाठणे शक्य नसल्याने व सर्वोच्च न्यायालय स्वत: घोडेबाजाराकडे लक्ष ठेवून असल्याने भाजपाने अखेर सरकार स्थापनेस नकार दिला़ आम आदमी पार्टीनेही दिल्लीत सरकार बनविण्यास अजिबात तयार नसल्याचे कळविले़ त्यामुळे दिल्लीत निवडणुका घेण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नायब राज्यपालांकडे उरला नव्हता़ (लोकमत न्यूज नेटवर्क)