प्रादेशिक पक्षांची मोदीविरोधी आघाडी
By Admin | Updated: November 7, 2014 04:54 IST2014-11-07T04:54:37+5:302014-11-07T04:54:37+5:30
संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात मोदी सरकारला घेरण्यासाठी विरोधकांनी ‘आघाडी’ उभारण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत़

प्रादेशिक पक्षांची मोदीविरोधी आघाडी
नवी दिल्ली : संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात मोदी सरकारला घेरण्यासाठी विरोधकांनी ‘आघाडी’ उभारण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत़ गुरुवारी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांच्या दिल्लीतील सरकारी निवासस्थानी आयोजित ‘लंच डिप्लोमसी’ याच प्रयत्नांचा एक भाग मानला जात आहे़ विशेष म्हणजे, या प्रयत्नांना काँग्रेसचीही साथ मिळण्याची शक्यता असल्याने संसदेचे आगामी अधिवेशन मोदी सरकारची कसोटी पाहणारे ठरण्याची चिन्हे आहेत.
मोदी सरकारला चहूबाजूंनी घेरण्यासाठी संसदेत सामायिक डावपेच तयार करण्याच्या योजनेंतर्गत मुलायम यांच्या निवासस्थानी गुरुवारी एका बैठकीचे आयोजन केले गेले़ राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव व त्यांच्या पत्नी राबडीदेवी, संयुक्त जनता दल अध्यक्ष शरद यादव, सेक्युलर जनता दलाचे नेते एच. डी. देवेगौडा आणि इंडियन नॅशनल लोकदलचे दुष्यंत चौटाला आदींनी या बैठकीला हजेरी लावली़ ‘दुपार भोज’ असे निमित्त असले तरी संसदेत संयुक्त आघाडीची शक्यता पडताळून बघणे हाच या बैठकीचा हेतू होता. त्यानुसार संसदेत मोदी सरकारला घेरण्याच्या डावपेचांवर बैठकीत दीर्घ चर्चा झाली़ उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसारया संयुक्त डावपेचांना काँग्रेसचेही पूर्ण पाठिंबा असेल़
केवळ संसदेत सरकारला घेरण्यापुरतीच नाही तर सपा, राजद, जदयू आणि अन्य प्रादेशिक पक्षांची ही मोट एक नवी राजकीय आघाडी म्हणून समोर येऊ शकते, असे संकेत बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिले आहेत़ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदी सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसही नव्या राजकीय आघाडी स्थापनेस खतपाणी देत आहे़ काळ्या पैशाच्या मुद्यावर राजद, जदयू, सपा, आयएनएलडी सरकारवर हल्ला करतील़ याचवेळी काँग्रेस आणि डावे पक्षही आक्रमक होतील़ काळ्या पैशाशिवाय बेरोजगारीचा मुद्दाही संसदीय डावपेचांच्या अजेंड्यावर आहे़
हमी भाव देण्याच्या नावावर झालेल्या शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा मुद्दाही काँग्रेससह सर्व पक्ष एका सुरात संसदेत उपस्थित करण्याच्या तयारीत आहेत़ राज्यसभेत महत्त्वपूर्ण विधेयके पारित करण्याचे सरकारचे प्रयत्न हाणून पाडण्याचेही या ‘संयुक्त आघाडी’चे प्रयत्न असणार आहेत़
दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदींना चहूबाजूंनी घेरून, ते ‘असत्याचे राजकारण’ करीत आहेत, हे सिद्ध करण्याचे या राजकीय विरोधकांचे प्रयत्न आहेत़ सूत्रांच्या मते, डावे पक्ष, ममता बॅनर्जी आणि जयललिता यांच्याहीही चर्चा सुरू असून भाजपा-काँग्रेसला एक सक्षम पर्याय उभा करण्याचेही प्रयत्न सुरू आहेत़ मोदींच्या वाढत्या लोकप्रियतेला सुरुंग लावण्याचे प्रयत्न यातून साधले जाणार असल्याने काँग्रेसलाही हा प्रयोग रुचला आहे़ (लोकमत न्यूज नेटवर्क)