गुजरात एटीएसने बंगळुरू येथून एका ३० वर्षीय तरुणीला अटक केली, तिच्यावर 'अल-कायदा इन द इंडियन सबकॉन्टिनेंट' (AQIS) या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचा आरोप आहे. शमा प्रवीण नावाची ही तरुणीमूळची झारखंडची आहे.
ती सोशल मीडियाच्या मदतीने दहशतवादी विचारसरणीचा प्रचार करत असल्याचा आरोप गुजरात सरकारने केला आहे. गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी शमाच्या अटकेला मोठे यश म्हटले आहे. तिचे पाकिस्तानशी कनेक्शन असल्याचे म्हटले आहे.
शमा प्रवीणला बंगळुरूच्या हेब्बलमधील मोनारायणपल्या येथील भाड्याच्या घरातून अटक करण्यात आली. ती बंगळुरूमध्ये काम करणाऱ्या तिच्या धाकट्या भावासोबत येथे राहत होती. अधिकारी सोशल मीडियावर अशा लोकांचा मागोवा घेत होते जे दहशतवादी मॉड्यूलच्या संपर्कात आहेत आणि अतिरेकी विचारांची सामग्री शेअर करतात, असं एटीएसने सांगितले. या अंतर्गत काही दिवसापूर्वी दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. आता त्यांच्या संपर्कात असलेल्या शमालाही अटक करण्यात आली आहे.
शमा अविवाहित आणि बेरोजगार आहे. तिच्यावर तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर प्रक्षोभक भाषणे आणि जिहादी सामग्री अपलोड करण्याचा आणि लोकांना तिला पाठिंबा देण्यास सांगण्याचा आरोप आहे. ती दहशतवाद्यांच्या संपर्कात होती आणि बंदी घातलेल्या संघटनांशी सहानुभूती दाखवत होती. ती अलीकडेच एटीएसने अटक केलेल्या लोकांना फॉलो करत होती. अटकेनंतर एटीएसने तिला बेंगळुरूमधील स्थानिक न्यायालयात हजर केले आणि ट्रान्झिट वॉरंट मिळवले.
एटीएसला मोठे यश
"एटीएसने यापूर्वीच एक्यूआयएसच्या चार दहशतवाद्यांना अटक केली आहे. काल आणखी एक मोठे यश मिळाले आहे. बंगळुरूची राहणारी एक महिला अतिशय कट्टर दहशतवादी आहे. ती ऑनलाइन दहशतवादी मॉड्यूलवर काम करते. तिचे महत्त्वाचे पाकिस्तानी संपर्क देखील वेगवेगळ्या उपकरणांवरून सापडले आहे", अशी माहिती गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी दिली.