आणखी एक दहशतवादी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2015 05:04 IST2015-08-28T05:04:08+5:302015-08-28T05:04:08+5:30
बारामुल्ला जिल्ह्यातील रफियाबादमध्ये नियंत्रण रेषेजवळ बुधवारी रात्रभर चाललेल्या चकमकीनंतर लष्कराने लष्कर-ए-तय्यबाच्या आणखी एका पाकिस्तानी दहशतवाद्याला पकडले असून

आणखी एक दहशतवादी अटकेत
श्रीनगर : बारामुल्ला जिल्ह्यातील रफियाबादमध्ये नियंत्रण रेषेजवळ बुधवारी रात्रभर चाललेल्या चकमकीनंतर लष्कराने लष्कर-ए-तय्यबाच्या आणखी एका पाकिस्तानी दहशतवाद्याला पकडले असून त्याच्या चार साथीदारांचा खात्मा केला. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव सज्जाद अहमद (२२) असून तो नैऋत्य पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मुजफ्फरगड येथील रहिवासी आहे.
काही आठवड्यांपूर्वीच उधमपूरमध्ये हल्ला करणारा लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी नावेद याला नागरिकांच्या मदतीने जिवंत पकडण्यात लष्कराला यश आले होते. चकमकीत एका दहशतवाद्याला बुधवारीच यमसदनी धाडण्यात आले होते तर तिघांचा गुरुवारी खात्मा करण्यात आला. दहशतवाद्यांसोबत संघर्षात एक जवान जखमी झाला. रफियाबादजवळ दहशतवाद्यांचा एक गट दडून बसला असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेपासून रफियाबाद क्षेत्रात पानजलापर्यंत शोध मोहीम सुरू केली होती.
दरम्यान, जिवंत पकडण्यात आलेला दहशतवादी आमच्यासाठी ठोस पुरावा आहे. पाकिस्तानच्या सहभागाबद्दल कुठलीही शंका नाही. या अटकेने आंतरराष्ट्रीय स्तरावर भूमिका मांडण्यास मदत मिळेल, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांनी सांगितले.
गुंफा सापडली : त्यांच्या या हालचाली लष्कराच्या गोपनीय तंत्रज्ञानाद्वारे टिपण्यात आल्या होत्या. त्यानुसार वेढा घालण्यात आला. बुधवारी चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. परंतु त्याच्या इतर साथीदारांचा ठावठिकाणा नव्हता.
हे दहशतवादी भारतीय क्षेत्रातच दडून बसले असावेत असा संशय होता. त्यानुसार त्यांच्या शोधाकरिता एक पथक तयार करण्यात आले.
शोधमोहिमेत रफियाबादच्या पहाडी भागात एक गुंफा सापडली. सुरक्षा दल तेथे पोहोचताच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरूकेला. प्रत्युत्तरातील कारवाईत तीन दहशतवादी ठार झाले.
चिली बॉम्बने घाबरला दहशतवादी
लष्कराच्या जवानांनी गुहेत दडून बसलेल्या दहशतवाद्यांना बाहेर काढण्यासाठी गुफेत ‘चिली बॉम्ब’ (तिखट) आणि अश्रुधुराचे नळकांडे फोडले. त्यानंतर घाबरलेला सज्जाद दयायाचना करूलागला. त्याचवेळी त्याला ताब्यात घेण्यात आले. या दहशतवाद्यांनी पाकव्याप्त काश्मिरातून घुसखोरी केली होती. लष्कराने शोधमोहीम सुरू केल्यानंतर हे दहशतवादी एका गुहेत लपून बसले होते.
लष्कराच्या अधिकाऱ्याने सांगितले की, येथून १०० किमी उत्तरेला व्याप्त काश्मिरातून घुसखोरी करणाऱ्या लष्कर-ए-तय्यबाच्या या पाच दहशतवाद्यांनी नियंत्रण रेषेलगतचे सुरक्षाकडे तोडण्याचा अनेकदा प्रयत्न केला होता.
शस्त्रसाठा जप्त
जम्मू क्षेत्रात किश्तवाड जिल्ह्यात सुरक्षा दलाने गुरुवारी दहशतवाद्यांच्या एका तळाचा शोध घेऊन तेथील शस्त्रास्त्र व दारूगोळ्याचा मोठा साठा जप्त केला. या आठवड्यातील ही तिसरी घटना आहे. संरक्षण खात्याच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, तुलमध्ये तैनात राष्ट्रीय रायफल्सचे जवान आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी शालोग गावाजवळ नईगड नाला भागात शोधमोहीम राबविली होती. यादरम्यान हे तळ सापडले. यापूर्वी २४ आॅगस्टला रामबन आणि २५ला रेयासी जिल्ह्यातील जंगलात मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता.
सज्जादची कबुली : प्राथमिक चौकशीत सज्जादने तो पाकिस्तानचा असून लष्कर-ए-तय्यबा या दहशतवादी संघटनेचा महत्त्वाचा सदस्य असल्याचे कबूल केले आहे. लष्करचा प्रमुख हाफिज सईद याच्याशी आपले जवळचे संबंध असल्याचेही त्याने तपास अधिकाऱ्यांना सांगितले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मोहिमेत रफियाबादच्या पहाडी भागात एक गुंफा सापडली. सुरक्षा दल तेथे पोहोचताच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरातील कारवाईत तीन दहशतवादी ठार झाले.