भूषण, यादव यांना आणखी एक धक्का
By Admin | Updated: April 1, 2015 23:43 IST2015-04-01T23:43:51+5:302015-04-01T23:43:51+5:30
यापुढे आपचे मुख्य प्रवक्ते योगेंद्र यादव आणि प्रवक्ते प्रशांत भूषण यांना पक्षाची भूमिका अधिकृतरीत्या मांडता येणार नाही.

भूषण, यादव यांना आणखी एक धक्का
नवी दिल्ली : यापुढे आपचे मुख्य प्रवक्ते योगेंद्र यादव आणि प्रवक्ते प्रशांत भूषण यांना पक्षाची भूमिका अधिकृतरीत्या मांडता येणार नाही. आपने २० नव्या प्रवक्त्यांच्या समितीची घोषणा करीत या दोघांचे प्रवक्तेपद काढून घेतले आहे. निवडणुकीच्या काळात महत्त्वाच्या प्रवक्त्या असलेल्या आतिशी मर्लेना यांनाही हटविण्यात आले आहे.
चार दिवसांपूर्वी या तिघांची पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर आपने मंगळवारी रात्री उशिरा या सर्वांना प्रवक्तेपदावरून हटविण्यात आल्याची घोषणा केली. भूषण यांना रविवारी शिस्तपालन समितीच्या अध्यक्षपदावरून हटविण्यात आले होते. नव्या प्रवक्त्यांमध्ये संजयसिंग, कुमार विश्वास, इलियास आझमी, पंकज गुप्ता, आशुतोष व आशिष खेताना या केजरीवालनिष्ठांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या प्रवक्तेपदी प्रीती शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)