गुजरातेत २,६५४ कोटींचा आणखी एक बँक घोटाळा; घोटाळाबाजांशी भाजप नेत्यांचा संबंध?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 01:29 IST2018-04-08T01:29:36+5:302018-04-08T01:29:36+5:30
नीरव मोदी व मेहुल चोक्सी यांच्या बँक घोटाळ््यानंतर काँग्रेसने गुजरातमधील बँक घोटाळा उघड करून त्याचा संबंध राज्याचे अर्थमंत्री सौरभ पटेल यांच्याशी असल्याचा दावा केला आहे. पटेल यांच्याशी संगनमताने ११ बँकांना २,६५४ कोटी रूपयांना फसवले गेल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.

गुजरातेत २,६५४ कोटींचा आणखी एक बँक घोटाळा; घोटाळाबाजांशी भाजप नेत्यांचा संबंध?
- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : नीरव मोदी व मेहुल चोक्सी यांच्या बँक घोटाळ््यानंतर काँग्रेसने गुजरातमधील बँक घोटाळा उघड करून त्याचा संबंध राज्याचे अर्थमंत्री सौरभ पटेल यांच्याशी असल्याचा दावा केला आहे. पटेल यांच्याशी संगनमताने ११ बँकांना २,६५४ कोटी रूपयांना फसवले गेल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.
काँग्रेसने शनिवारी जी कागदपत्रे जाहीर केली, त्यात सीबीआयने २६ मार्च, २०१८ रोजी गांधीनगरमध्ये दाखल केलेल्या एफआयआरची प्रत आहे. या २,६५४ कोटी रूपयांच्या घोटाळ्यात व ११ बँकांच्या फसवणुकीत अर्थमंत्र्यांचे सहकारी नारायण भटनागर व त्यांची मुले अमित व सुमित भटनागर यांची नावे घेतली जात आहेत. अमित भटनागर यांना भाजपा नेत्यांचा आशीर्वाद असून त्यामुळेच बँक घोटाळेही केले जात आहेत, असा काँग्रेसचा आरोप आहे.
बँक घोटाळ््याच्या धर्तीवर अमित भटनागर यांनी बँकांकडून कर्ज घेऊन त्यांची फसवणूक केली. त्यांनी २०१६ मध्ये कंपनीचे दिवाळे निघाल्याचे जाहीर केले होते. विशेष म्हणजे भाजपाने गुजरातमध्ये आयोजित केलेल्या एका महोत्सवावर अमित भटनागरने २६ कोटी रुपये खर्च केले होते. हे अमित भटनागरने मान्य केले आहे. अमित भटनागर व अर्थमंत्री सौरभ पटेल यांच्यातील नेमके काय नाते आहे, असा सवाल करून, काँग्रेसचे नेते अशोक गहलोत व पवन खेडा म्हणाले की, सौरभ पटेल ऊर्जामंत्री असताना अमित विजेच्या तारा बनवित. त्यांनी पटेल यांच्या साह्याने आंतरराष्ट्रीय स्विच संमेलन केले होते. त्याला पीयूष गोयल व गुजरातच्या तेव्हाच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल हजार होत्या. त्यावर सरकारी तिजोरीतून कोट्यवधी रुपये खर्च केले होते. सध्या बडोद्यातील भाजपाच्या सर्व समारंभांचा, कार्यक्रमांचा खर्च अमित भटनागर करतात.
कर्जे झाली एनपीए
अमित भटनागर बँकांना धोका देत आहे याची माहिती असूनही बँक आॅफ इंडियाच्या बडोदा शाखेने त्यांच्या डीपीआयएल कंपनीचे कर्ज फेब्रुवारी २०१६ रोजी एनपीएमध्ये का बदलले? तसेच २०१७ मध्ये अन्य बँकांनीही त्यांच्या कंपनीवरील कर्ज रक्कम एनपीएमध्ये का रुपांतरित केले, असा सवाल काँग्रेसने केला आहे.