आसामात पुराचे आणखी ५ बळी
By Admin | Updated: September 8, 2015 04:16 IST2015-09-08T04:16:51+5:302015-09-08T04:16:51+5:30
आसामात पूरस्थिती गंभीर असून सुमारे १८ लाख लोक प्रभावित झाले आहेत. सोमवारी पुराने आणखी पाच बळी घेतले. याचसोबत पुरामुळे राज्यात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढून ४१ झाली.

आसामात पुराचे आणखी ५ बळी
गुवाहाटी : आसामात पूरस्थिती गंभीर असून सुमारे १८ लाख लोक प्रभावित झाले आहेत. सोमवारी पुराने आणखी पाच बळी घेतले. याचसोबत पुरामुळे राज्यात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढून ४१ झाली.
गत महिन्याच्या अखेरीस पुरात पाच लोक वाहून गेले होते. यावर्षी दोनदा आलेल्या पुरातील बळींची संख्या ४६ झाली आहे.
मदत पोहोचविण्याचे आदेश
महापुराचा फटका बसलेल्या जिल्ह्यांतील लोकांना अन्न, औषधे आणि इतर आवश्यक गोष्टी पुरेशा प्रमाणात मिळतील याची दक्षता घेण्याचे आदेश आसामचे मुख्यमंत्री तरूण गोगोई यांनी सोमवारी सर्व उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले.
आसाममध्ये लाखो लोकांना पुराचा फटका बसला असून त्यांना मदत करण्याऐवजी भारतीय जनता पक्षाचे नेते मगरीचे अश्रु गाळत आहेत व चिखलफेक करीत आहेत, असा हल्ला गोगोई यांनी भाजपवर केला. दरम्यान, राज्यातील पूरपरिस्थितीचा मुख्यमंत्री गोगोई ‘क्षुद्र राजकारणासाठी’ वापर करीत असल्याची टीका सोमवारी केंद्रीय युवक कामकाज व क्रीडा मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी केली. (वृत्तसंस्था)