ंअधिवेशन-गॅलरीतून
By Admin | Updated: March 20, 2015 22:40 IST2015-03-20T22:40:00+5:302015-03-20T22:40:00+5:30

ंअधिवेशन-गॅलरीतून
>ओवाळून टाकलेले पोरं...विधानपरिषदेत टोलवरुन चर्चा सुरु होती. आमदारांनादेखील टोल नाक्यावर कसा त्रास दिला जातोय याची वर्णनं आमदार करत होते. टोलनाक्यांवर होणार्या त्रासाचे ऐकेक किस्से सदस्य सांगत होते. सदस्य ज्या भावना व्यक्त करत आहेत त्या काही अंशी खर्या आहेत असे स्वत: सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकात पाटील म्हणाले त्याचवेळी प्रेक्षक गॅलरीत माजी मंत्री छगन भूजबळ हे सगळं ऐकत होते हे विशेष... असो... मुद्दा पुढेच आहे. या चर्चेत बोलताना सोलापूरचे आ. दिपकराव साळुंखे म्हणाले, सभापती महोदय, टोलनाक्यावर वसुली करायला बसवलेली पोरं सगळ्या गावावरुन ओवाळून टाकलेली आहेत... त्यांना काय बोलायचं, कसं बोलायचं काय पण कळत नाही... आणि गॅलरीत बसलेल्या भूजबळ आणि अजित पवारांनाही आपले हसू आवरता आले नाही.नेते गॅलरीत, स्फूरण सभागृहात!विधानपरिषदेच्या सभापतींची निवड हा राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेचा मुद्दा बनला होता. त्यामुळे निवड प्रक्रिया सुरु होण्याआधीच प्रेक्षक गॅलरीत अजित पवार, छगन भूजबळ, दिलीप वळसे पाटील, शशिकांत शिंदे येऊन बसले. त्यावेळी सभागृहात प्रश्नोत्तरे चालू होती. वरती आपल्या पक्षाचे नेते बसलेले पाहून खाली सदस्यांना एकदम स्फूरण चढले आणि ते हिरीरीने प्रश्न विचारु लागले. आ. विक्रम काळे यात आघाडीवर होते... काही जण वरती बसलेल्या नेत्यांना खालूनच हात जोडून नमस्कार करत आम्ही आहोत... याची जाणीवही करुन देत होते... एकंदरीतच नेते गॅलरीत बसल्याने सभागृहात स्फूरण चढले होते...माजी अध्यक्षांचे असेही रुपमाजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांची अध्यक्षपदाच्या कार्यकाळातील कारकीर्द अतिशय शिस्तीची होती. नियम, प्रथा, परंपरांवर जोर देत, अनेकदा कौल आणि शकधर यांचे दाखले देत ते कामकाज चालवायचे. एखाद्या विषयावरची चर्चा पुढे गेली की ते काही झाले तरी ते मागचे कामकाज पुन्हा घ्यायचे नाहीत. मात्र त्यांचे वेगळे रुप शुक्रवारी विधानसभेत पहायला मिळाले. उर्जा खात्यावरची चर्चा पूर्ण झाली. तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी पुढचे कामकाज पुकारले. त्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी आपल्याला बोलायचे आहे असे सांगत उर्जा विषयावर बोलणे सुरु केले. तालिका अध्यक्षांनी देखील दोनदा कामकाज पुढे नेले, पुन्हा मागे आणले... हे पाहून अनेकांना माजी अध्यक्षांची शिस्तप्रिय कारकिर्द आठवली नसेल तर नवल..!चार चार अंगठ्यांचा मंत्रीउर्जा खात्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत उर्जा खात्यावरील चर्चेला विस्ताराने उत्तर दिले. प्रत्येकाचे समाधान करत ते उत्तर देत होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जैतापूरवरुन अडचणीत टाकणारा बॉल त्यांच्या दिशेने भिरकावला त्यावेळी हा राजकीय प्रश्न आहे. यावर मी बोलणे योग्य नाही, असे सांगत त्यांनी त्याला नॉ बॉल करुन टाकले. मात्र बराच काळ त्यांचे उत्तर चालू होते. तेव्हा त्यांच्या हातातल्या चारही बोटातील अंगठ्या मात्र चर्चेचा विषय बनल्या होत्या. कोणी म्हणाले तो त्यांच्या श्रध्देचा विषय आहे तर कोणी म्हणाले ते जातिवंत श्रीमंत आहेत, तर काहींच्या मते ते वीज खात्याचेच ठेकेदारही होते... काही असो, यानिमित्ताने गोल्डमॅन रमेश वांजळेंचीही काहींना आठवण झाली...- अतुल कुलकर्णी