‘शेतकऱ्यांसंबंधी अण्णा हजारे यांची चिंता रास्तच’
By Admin | Updated: March 18, 2015 23:44 IST2015-03-18T23:44:16+5:302015-03-18T23:44:16+5:30
मोदी सरकारने आणलेल्या भूसंपादन विधेयकाबाबत समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केलेली चिंता योग्यच असल्याचे सांगत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी त्यांच्या भावनेशी सहमती दर्शविली आहे.
‘शेतकऱ्यांसंबंधी अण्णा हजारे यांची चिंता रास्तच’
नवी दिल्ली : मोदी सरकारने आणलेल्या भूसंपादन विधेयकाबाबत समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केलेली चिंता योग्यच असल्याचे सांगत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी त्यांच्या भावनेशी सहमती दर्शविली आहे. विधेयकाला सर्व व्यासपीठांवर जोरदार विरोध करणार असल्याची ग्वाही त्यांनी पत्रात दिली.
हजारे यांनी या विधेयकाबाबत पाठविलेल्या पत्राला सोनिया यांनी मंगळवारी उत्तर पाठविले. १४ पक्षांनी एकजूट होऊन मंगळवारी राष्ट्रपती भवनावर ‘निषेध मार्च’ नेत या विधेयकाला विरोध केल्याचा उल्लेखही त्यांनी केला. तुम्ही १४ मार्च रोजी पाठविलेल्या पत्रात भूसंपादन विधेयक २०१५ बद्दल शंका व्यक्त केली. रालोआने आणलेला वटहुकूम व त्यातील सुधारणांचा मुद्दा संसदेसमोर आहे, असे सोनिया म्हणाल्या.
या विधेयकाला सर्व स्तरावर विरोध केला जाईल. राष्ट्रपतींच्या हस्तक्षेपाची आम्ही केलेली मागणी हे त्याचे उदाहरण आहे. आमचा लढा सुरूच राहील असे आश्वासन मी तुम्हाला देऊ इच्छिते असे सोनिया गांधी म्हणाल्या. हा पत्रव्यवहार उभय नेत्यांतील सौहार्दपूर्ण संबंधांचे संकेत देणारा मानला जात आहे.
संसदेत लोकपाल विधेयक पारित करण्यात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बजावलेल्या भूमिकेची अण्णा हजारे यांनी प्रशंसा केली होती.