किस्सा कुर्सी का...

By Admin | Updated: October 6, 2014 04:46 IST2014-10-06T04:46:58+5:302014-10-06T04:46:58+5:30

असत्य, अत्यल्प व अपूर्ण माहितीच्या आधारावर फेकूगिरी करण्याची सवय पंतप्रधान झाल्यावरही नरेंद्र मोदी यांनी सोडलेली नाही.

Anecdote | किस्सा कुर्सी का...

किस्सा कुर्सी का...

मोदींची फेकूगिरी सुरूच
असत्य, अत्यल्प व अपूर्ण माहितीच्या आधारावर फेकूगिरी करण्याची सवय पंतप्रधान झाल्यावरही नरेंद्र मोदी यांनी सोडलेली नाही. मुंबईकरांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या व्हिक्टोरिया टर्मिनसचे छत्रपती शिवाजी टर्मिनस असे नामकरण अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात झाले, असे त्यांनी तासगाव येथील सभेत ठोकून दिले. वास्तविक, व्ही.टी. स्टेशनचे छत्रपती शिवाजी टर्मिनस असे नामकरण सुरेश कलमाडी रेल्वे राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) असताना त्यांच्या काळात झाले. (बिच्चारे कलमाडी ही एक उपलब्धी सोडली तर त्यांची ओळख कॉमनवेल्थ पुरतीच उरते!) तासगावच्या सभेत त्यांनी जनधन योजनेतंर्गत गरीब खातेदारांनी ३००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली असे सांगून टाकले, तर अमेरिकेत असताना त्यांनी हाच आकडा १५०० कोटी असल्याचे सांगितले होते! मोदींनी त्यांच्या शनिवारच्या सभांत इंदिरा गांधी यांच्या काळात झालेल्या बँकांच्या राष्ट्रीयकरणाच्या निर्णयाचा उल्लेख करीत राष्ट्रीयकरणानंतरही बँकांमध्ये गरीब दिसत नाही, असा जावईशोध लावला. देशातील अनेक बँकांमध्ये शेतकरी, कामगार, घरकाम करणाऱ्या महिला, महिला बचतगट यांची खाती असून ही सर्व गोरगरीब माणसं आहेत. परंतु ‘खोटं बोल पण रेटून बोल' या शाखेचे मोदी पूर्णवेळ कार्यकर्ते असल्याने प्रधानसेवक झाल्यावरही त्यांची सवय सुटलेली नाही. उत्तराखंडात महाप्रलय झाल्यावर दोन दिवसांत १५ हजार गुजरातींना मोदी सरकारने बाहेर काढले, अशी थापेबाजी केली गेली. सरदार पटेल यांच्या अंत्ययात्रेत पंतप्रधान जवाहरलाल नेहरू सहभागी झाले नव्हते, अशी लोणकढी थाप त्यांनी मारली. पण मोरारजी देसाई (हेही गुजराती) यांच्या ‘दी स्टोरी आॅफ माय लाईफ' ग्रंथाचा हवाला देत मोदींचा खोटारडेपणा काहीनी उघड केला. चंद्रगुप्त मौर्य यांना‘गुप्त' घराण्याच्या पदरात टाकण्याचे औधत्य मोदींनी दाखवले. वास्तवात ते मौैर्य घराण्याचे होते. पाकिस्तानच्या वायव्य प्रांतात असलेली तक्षशिला बिहारमध्ये आणून ठेवण्याची करामत याच मोदींनी केली होती. मोदींची गांधीगिरी किती प्रामाणिकपणे सुरु आहे हे सांगता येत नाही पण फेकूगिरी अखंड सुरु आहे.
रविकिशनची कोलांटउडी
लोकसभा निवडणूक जेमतेम तीन-चार महिन्यांपूर्वी झाली. त्यामुळे त्यावेळी काय झाले याचे विस्मरण व्हावे एवढा हा अवधी मोठा नाही. लोकसभा निवडणुकीत भोजपुरी कलाकार रविकिशन हे स्वत: काँग्रेसच्या तिकीटावर जौनपूरमधून निवडणूक लढवत होते. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे दिंडोशीतील उमेदवार राजहंस सिंह यांच्या निवडणूक प्रचाराकरिता रविकिशन हे आले होते. रविकिशन यांची झलक पाहण्याकरिता त्यावेळी उत्तर भारतीयांची गर्दी उसळली होती. लोकसभा निवडणुकीत उसळलेल्या मोदी लाटेत (भाजपाचीच मंडळी ती त्सुनामी होती असं म्हणतात) रविकिशन यांच्यासह काँग्रेसचे भलेभले उमेदवार वाहून गेले. आता तेच रविकिशन भाजपाचे मोहित कंबोज यांच्या प्रचाराकरिता दिंडोशीत येऊन गेले. रविकिशनची ही कोलांटउडी सध्या चर्चेचा विषय आहे.

Web Title: Anecdote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.