...तर ‘विक्रांत’ वाचली असती
By Admin | Updated: June 2, 2014 06:41 IST2014-06-02T06:41:10+5:302014-06-02T06:41:10+5:30
भारतीयांच्या गळ्यातील ताईत बनलेली विमानवाहू युद्धनौका ‘आयएनएस विक्रांत’ गेल्या आठवड्यात मोडीत काढण्यासाठी रवाना झाली

...तर ‘विक्रांत’ वाचली असती
डिप्पी वांकाणी, मुंबई - बांगलादेश मुक्तीसाठी भारत-पाकिस्तानमध्ये १९७१ साली झालेल्या युद्धात बजावलेल्या गौरवशाली कामगिरीमुळे भारतीयांच्या गळ्यातील ताईत बनलेली विमानवाहू युद्धनौका ‘आयएनएस विक्रांत’ गेल्या आठवड्यात मोडीत काढण्यासाठी रवाना झाली. मात्र लिलावात सहभागी झालेल्या दोन कंपन्यांनी, नौदलाने तिच्यावरून हेलिकॉप्टर सफरी सुरू करण्यास नकार दिल्याने २०११ मध्ये माघार घेतली नसती तर ‘विक्रांत’चे भवितव्य बदलले असते. लिलावात सहभागी झालेल्या सहारा उद्योग समूहातील अॅम्बी व्हॅली सिटी लिमिटेड या कंपनीतील सूत्रांनी सांगितले की, महाराष्ट्र सरकारने जेव्हा निविदा मागिवल्या तेव्हा ‘विक्रांत’वरून पर्यटकांसाठी हेलिकॉप्टर सफरी सुरू करण्याची तरतूद होती. पण नंतर नौदलाने सुरक्षेच्या कारणास्तव त्याला नकार दिला आणि आम्ही निविदा प्रक्रियेतून माघार घेतली. ‘विक्रांत’वरील धावपट्टीचा वापर करून हेलिकॉप्टर सफरी सुरू करण्यासाठी असलेली पूर्वअट ही त्यातील एकमेव अडचण होती. एखाद्या खासगी कंपनीला नौदलाच्या हवाई हद्दीचा वापर करू देणे सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नव्हते. त्यामुळे नौदलाने ही मागणी नाकारली, असे सूत्रांनी सांगितले. महाराष्ट्र अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनी आणि नौदलातील संवादाचा अभाव हेही त्यामागील एक कारण आहे. कंपनीचे अधिकारी नौदलाला न कळवता अशा हवाई सफरींसाठी निविदा कशा मागवू शकतात, असे सूत्रांनी स्पष्ट केले. सहारा समूहाच्या प्रवक्त्याने सांगितले की, आम्ही ६०० कोटी रुपयांची निविदा भरली होती आणि त्यातून माघार घेतल्याने ५ कोटी रुपयांची अनामत रक्कमही गमावली. आम्ही या युद्धनौकेवर ५०,००० चौरस फुटांचे संग्रहालय आणि सर्व सोयींनी युक्त असे हॉटेल बनवण्याचा प्रस्ताव सादर केला होता. आॅयस्टर रॉकवर स्थिरावलेल्या नौकेवरून पर्यटकांसाठी हेलिकॉप्टर सफरी, तेथे पोहोचण्यासाठी गेटवे आॅफ इंडियापासून दीड किलोमीटरचा रस्ता आणि जेट्टी (धक्का) यांचाही त्यात समावेश होता. निविदेत नौकेच्या धावपट्टीवरून हेलिकॉप्टर उड्डाणाची पूर्वअट होती. पण आम्हाला नंतर नौदलाने सुरक्षेच्या कारणास्तव नकार दिला, असे सहाराने ‘लोकमत’ला पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे.