अन् किरण बेदी भावूक झाल्या
By Admin | Updated: February 4, 2015 13:22 IST2015-02-04T13:14:31+5:302015-02-04T13:22:27+5:30
कडक शिस्तीसाठी ओळखल्या जाणा-या किरण बेदी या बुधवारी दिल्लीतील प्रचारादरम्यान भावूक झाल्या होत्या. दिल्लीतील रोड शोला मिळणा-या प्रतिसाद बघून किरण बेदी यांना अश्रू आवरता आले नाही.

अन् किरण बेदी भावूक झाल्या
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ४ - कडक शिस्तीसाठी ओळखल्या जाणा-या किरण बेदी या बुधवारी दिल्लीतील प्रचारसभेत भावूक झाल्या होत्या. दिल्लीतील रोड शोला मिळणा-या प्रतिसाद बघून किरण बेदी यांना अश्रू आवरता आले नाही. 'जनतेकडून मिळणारा प्रतिसाद बघून मी माझ्या भावनांना थांबवू शकले नाही, दिल्लीकरांना दाखवलेल्या प्रेमाची मी परतफेड करीन' अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून प्रचारासाठी मोजकेच दिवस राहिल्याने भाजपा, आपसह सर्वच राजकीय पक्षांचा जोमाने प्रचार सुरु आहे. बुधवारी किरण बेदी यांनी कृष्णानगर या त्यांच्या मतदारसंघात रोड शो काढला होता. पोलिस खात्यात कडक शिस्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या किरण बेदी या निवृत्तीनंतर त्यांच्या कणखर स्वभावामुळे परिचित आहेत. मात्र कृष्णानगर येथील रोड शोमध्ये किरण बेदींचे भावनिक रुप दिसले. कृष्णानगर येथे किरण बेदींचा रोड जसा जसा पुढे सरकत गेला तसा रोड शोमध्ये सहभागी होणा-यांचे प्रमाण वाढत गेले. जोरदार स्वागत आणि घोषणाबाजीमुळे परिसर दणाणून गेला होता. हे सर्व बघून किरण बेदी अत्यंत भावूक झाल्या आणि रोड शो दरम्यान त्यांना रडू कोसळले. यानंतर अवघ्या काही क्षणात त्यांनी स्वत:ला सावरले व पुन्हा रोड शोमध्ये सहभागी झाल्या.
रोड शोपूर्वी किरण बेदींनी अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला. केजरीवाल यांना प्रसिद्धीत राहायचे असून म्हणूनच ते नकारात्मक विधान करतात असे बेदींनी सांगितले. केजरीवाल बोगस कंपन्यांकडून निधी स्वीकारल्याचा आरोपावर अटक करण्याचे आव्हान दिले आहे. यावर बेदी म्हणाल्या, केजरीवाल यांना जाणूनबुजून तुरुंगात जायचे आहे. तुरुंगात गेल्यास जास्त मतं मिळतील असे त्यांना वाटते. म्हणूनच ते हा खटाटोप करत आहे अशी टीका त्यांनी केली.