...आणि गिरिराज सिंग यांना रडू कोसळले
By Admin | Updated: April 22, 2015 00:31 IST2015-04-22T00:31:58+5:302015-04-22T00:31:58+5:30
केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग यांच्यासाठी मंगळवारचा दिवसही वाईट ठरला. सोमवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या विरोधात वर्णभेदी वक्तव्य केल्याबद्दल त्यांना

...आणि गिरिराज सिंग यांना रडू कोसळले
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग यांच्यासाठी मंगळवारचा दिवसही वाईट ठरला. सोमवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या विरोधात वर्णभेदी वक्तव्य केल्याबद्दल त्यांना माफी मागावी लागली. त्यानंतर मंगळवारी त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावले. भाजप संसद सदस्यांच्या बैठकीनंतर मोदी कार्यालयातच गिरिराज यांना भेटले. या भेटीत पंतप्रधान मोदी यांनी अगदी कडक शब्दात गिरिराज यांची कानउघाडणी केली, मोदी यांचे बोलणे चूपचाप ऐकणाऱ्या गिरिराज यांना अखेर रडू कोसळले. गिरिराजसिंग यांनी असे घडल्याचा इन्कार केला आहे.
गिरिराज यांनी नंतर अशी काही बैठक झाल्याचा इन्कार केला आहे. पंतप्रधान मोदी यांच्याशी अशी भेट झालीच नाही, त्यामुळे रडू कोसळण्याचा प्रश्नच नाही, असे गिरिराजसिंग यांनी पत्रकारांना सांगितले.
मोदी यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत आपण भावुक झाला होता काय? असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला होता. त्यावर बोलताना गिरिराज यांनी अशी भेट झाल्याचा इन्कार केला. अशी भेट झालीच नाही. मी पंतप्रधान मोदी यांना भेटलो असे कोणी सांगितले? असा प्रश्न गिरिराजसिंग यांनी विचारला.
सिंग यांना सोमवारी लोकसभेत खेद व्यक्त करावा लागला होता. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबद्दल वर्णभेदी उद्गार काढणाऱ्या गिरिराजसिंग यांच्याविरोधात काँग्रेस सदस्यांनी गोंधळ घातला. त्यांना उत्तर द्या असे लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी सांगितले. त्यामुळे गिरिराज सिंग यांना माफी मागावी लागली. मला कोणालाही दुखवायचे नव्हते, माझ्या बोलण्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो, असे गिरिराज सिंग म्हणाले. गिरिराज सिंग यांच्या वक्तव्यामुळे महिलावर्गाचा अपमान झाला असून, गिरिराजसिंग यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस सदस्यांनी केली होती. गिरिराजसिंग हे केंद्रातील लघु व मध्यम उद्योगमंत्री आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)