नवी दिल्ली : हेरगिरीचा खोटा खटला भरून पाकिस्तानने फाशीची शिक्षा ठोठावलेले कुलभूषण जाधव हे केवळ त्यांच्या आई-वडिलांचे नव्हेत तर संपूर्ण भारताचे सुपुत्र आहेत. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रसंगी ‘वाकडी वाट’ धरावी लागली तरी ती धरण्याची सरकारची तयारी आहे, अशी ग्वाही परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी बुधवारी दिली. पाकिस्तान बधले नाही तर त्याचे द्विपक्षीय संबंधांवर फार गंभीर परिणाम होतील, याची स्पष्ट जाणीवही स्वराज यांनी शेजारी देशास दिली. एरवीचे राजकीय मतभेद विसरून सर्व राजकीय पक्ष एकत्र आले आणि जाधव प्रकरणी पाकिस्तानच्या धिक्काराचे ठरावही संसदेच्या दोन्ही सभागृहांनी एकमताने मंजूर केले.या प्रकरणी भारत सरकारची नि:संदिग्ध भूमिका स्पष्ट करणारे निवेदन स्वराज यांनी दोन्ही सभागृहांमध्ये केले. राज्यसभेत विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी केलेल्या सूचनेवर परराष्ट्रमंत्री म्हणाल्या की, जाधव यांची फाशी टळावी यासाठी जे काही करावे लागेल ते सर्व केले जाईल. यासाठी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यासाठी जाधव यांना उत्तमातील उत्तम वकील उपलब्ध करून दिले जातील. एवढेच नव्हे तर हा विषय आम्ही त्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांकडेही नेऊ.स्वराज यांच्या निवेदनात बराच भाग जाधव यांच्यावरील खटला हा कसा निव्वळ फार्स होता आणि त्यांच्याविरुद्ध कोणतेही पुरावे नसताना व बजावाची संधी न देताना ही शिक्षा पूर्व नियोजित पद्धतीने कशी ठोठावण्यात आली, याविषयीच्या तपशिलाचा होता. भारतात दहशतवादी कारवायांना खतपाणी घालण्याच्या नित्यनेमाने सुरु असलेल्या दुष्कृत्यांवरून जगाचे लक्ष अन्यत्र वळविण्यासाठी पाकिस्तानने जाधव यांच्यावरील खटल्याचे हे कुभांड रचले आहे, असा त्यांनी आरोप केला. स्वराज म्हणाल्या, जाधव यांच्या कथित फाशीचा विषय हा पक्ष अथवा प्रतिपक्षाचा नाही भारताच्या अस्मितेचा आहे. जाधव भारतीय नौसेनेचे निवृत्त अधिकारी आहेत. सरकारी कामकाजाशी त्यांचा कोणताही संबंध नाही. हा कुटिल डाव उघड होऊनही जाधव यांना फासावर लटकविण्याचा अधमपणा करण्यात आला तर त्याचे द्विपक्षीय संबंधांवर काय गंभीर परिणाम होतील याची पाकिस्तानने जाणीव ठेवावी, असा इशाराही त्यांनी दिला.राजनाथसिंग लोकसभेत म्हणाले, कुलभूषणकडे अधिकृत व्हिसा आहे. त्याला भारताचा गुप्तहेर कसा ठरवता येईल? भारत सरकार अत्यंत गांभीर्याने सदर प्रकरणाकडे पहात आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)सत्ताधारी-विरोधकांची राष्ट्रहितासाठी एकदिलीराष्ट्रहितासाठी पक्षीय राजकारण गौण मानण्याचा आदर्श वस्तुपाठ सत्ताधारी व विरोधी पक्षांनी संसदेत घालून दिला. संसदेत मांडण्याचा पाकिस्तानच्या धिक्काराच्या ठरावाचा मसुदा तयार करण्यासाठी सुषमा स्वराज यांनी राजनैतिक अधिकारी म्हणून करियर केलेल्या काँग्रेसच्या शशी थरूर यांची मदत घेतली. मसुद्यावर चर्चा व सल्लामसलत करण्यासाठी स्वराज उठून थरूर यांच्या आसनापाशी गेल्या. थरूर यांनी काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते मल्लिकार्जू़न खारगे यांच्याकडे औपचारिक संमतीसाठी कटाक्ष टाकला व खारगे यांनीही मोठ्या मनाने संमती दिली.पाक हेराची सरबराई जाधव यांच्या अन्याय्य शिक्षेवरून देशभरात पाकिस्तानविषयी संतापाची लाट उसळली असताना भारत मात्र एका पाकिस्तानी हेराला ‘सरकारी पाहुणा’ म्हणून सांभाळण्याची माणुसकी दाखवत आहे. पाकिस्तानच्या ‘आयएसआय’ साठी हेरगिरी करणाऱ्या साजीद मुनीर या पाकिस्तानी नागरिकास सन २००४ मध्ये भोपाळमध्ये अटक झाली. रीतसर खटला चालून त्याला १२ वर्षांची शिक्षा झाली. यंदाच्या ५ जून रोजी शिक्षा भोगून पूर्ण झाल्यावर साजीद तुरुंगातून सुटला. परंतु वारंवार विनंती करूनही पाकिस्तान त्याला न्यायला तयार नसल्याने गेले १० महिने भोपाळ पोलीस या साजीदचा सांभाळ करीत आहे.अपिलासाठी ६० दिवस!लष्करी न्यायालयाने ठोठावलेल्या फाशीच्या शिक्षेविरुद्ध कुलभूषण जाधव ६० दिवसांत सर्वोच्च न्यायालयात अपील करू शकतात, असे पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा युसूफ यांनी तेथील सिनेटमध्ये बोलताना सांगितले. जाधव यांना सर्व कायदेशीर प्रक्रियांची पूर्तता करूनचशिक्षा देण्यात आली आहे, असा कांगावाही त्यांनी केला. एवढेच नव्हे तर भारत काश्मिरी युवकांचे दररोज पूर्व नियोजित खून पाडत आहे, अशी गरळही त्यांनी ओकली.जाधव यांच्या कथित फाशीचा विषय हा पक्ष अथवा प्रतिपक्षाचा नाही भारताच्या अस्मितेचा आहे. जाधव भारतीय नौसेनेचे निवृत्त अधिकारी आहेत. सरकारी कामकाजाशी त्यांचा कोणताही संबंध नाही. - सुषमा स्वराज
...तर भारत-पाक संबंधांवर परिणाम
By admin | Updated: April 12, 2017 01:08 IST