Anant Singh Attacked : बिहारचा मोकामा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बिहारमध्ये छोटे सरकार म्हणून प्रसिद्ध असलेले बाहुबली नेते अनंत सिंह यांच्या ताफ्यावर गोळीबाराची घटना घडली आहे. त्यांच्या वाहनावर 60 ते 70 राउंड गोळ्या घाडण्यात आल्या. सुदैवाने अनंत सिंह या हल्ल्यातून बचावले. हा हल्ला सोनू-मोनू टोळीने केल्याचा आरोप आहे. अनंत सिंग आणि सोनू-मोनू यांच्यात यापूर्वीही अनेकदा वाद झाले आहेत.
या घटनेनंतर बिहारमध्ये खळबळ उडाली असून, पोलिसांनी घाईघाईने राजधानी पाटणा येथून मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा मोकामाच्या दिशेने रवाना केला आहे. ही घटना मोकामाच्या हेमजा गावात घडली. घटनेच्या वेळी मोकामाचे माजी आमदार अनंत कुमार सिंह गावात सामान्य लोकांना भेटत होते. यावेळी कुख्यात गुन्हेगार सोनू-मोनूच्या टोळीने त्यांच्या ताफ्यावर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. या घटनेत अनंत सिंग थोडक्यात बचावले, मात्र ताफ्यातील एक व्यक्ती गोळीबार होऊन गंभीर जखमी झाला.
गोळीबाराच्या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. संपूर्ण परिसरातच नव्हे तर पोलीस आणि प्रशासनात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. घाईघाईत एएसपी राजधानीतून मोठ्या संख्येने पोलिसांसह घटनास्थळी पोहोचले. यानंतर अनंत सिंह यांना त्यांच्या ताफ्यासह तेथून रवाना करण्यात आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.