आनंदीबेन पटेल गुजरातच्या मुख्यमंत्री ?
By Admin | Updated: May 18, 2014 15:18 IST2014-05-18T15:18:06+5:302014-05-18T15:18:06+5:30
नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदावर झेप घेतली असतानाच गुजरातमधील मुख्यमंत्रीपदाचाही तिढा सुटला आहे. नरेंद्र मोदींनंतर आता गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावर आनंदीबेन पटेल यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.

आनंदीबेन पटेल गुजरातच्या मुख्यमंत्री ?
>ऑनलाइन टीम
गांधीनगर, दि. १८ - नरेंद्र मोदींनी विरोधकांना धूळ चारुन पंतप्रधानपदावर झेप घेतली असतानाच गुजरातमधील मुख्यमंत्रीपदाचाही तिढा सुटला आहे. नरेंद्र मोदींनंतर आता गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावर आनंदीबेन पटेल यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता असून २१ मे रोजी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होईल असे सांगितले जाते.
लोकसभा निवडणुकीत भाजपला भरघोस मताधिक्य मिळाल्याने नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील हे स्पष्ट झाले आहे. पंतप्रधानपदाची शपथ घेण्यापूर्वी मोदींना गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यामुळे गुजरातमधील मोदींचा उत्तराधिकारी कोण यावर गेले दोन दिवस चर्चा सुरु आहे. मोदी व त्यांच्या टीमने गुजरातमधील उत्तराधिकारी निवडल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. गुजरातमधील रस्ते व महसूल खात्याच्या मंत्री आनंदीबेन पटेल यांची मुख्यमंत्रीपदावर वर्णी लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. २१ मे रोजी मोदी गुजरातच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतील व त्यानंतर आनंदीबेन पटेल यांच्या नावाची अधिकृत घोषणा होईल असे सांगितले जाते.
माजी प्राचार्य असलेल्या आनंदीबेन पटेल या मोदींच्या विश्वासू सहकारी म्हणून ओळखल्या जातात. पक्षात व गुजरातमधील नोकरशाहांमध्ये त्या लोकप्रिय आहेत. विशेष म्हणजे गुजरातमधील शक्तिशाली पटेल समाजाचा त्यांना पाठिंबा आहे. राजकारणाचा दांडगा अनूभव असलेल्या आनंदीबेन या केशूभाई पटेल यांच्या मंत्रिमंडळातही होत्या. १९९४ मध्ये राज्यसभा व त्यानंतर १९९८ मध्ये पुन्हा विधानसभेत त्या आमदार म्हणून निवडून गेल्या आहेत.