बौद्धांचे प्रेरणास्रोत अनागारिक धम्मपाल

By Admin | Updated: January 23, 2015 01:03 IST2015-01-23T01:03:36+5:302015-01-23T01:03:36+5:30

Anagara Dhammapal of Buddhist inspiration | बौद्धांचे प्रेरणास्रोत अनागारिक धम्मपाल

बौद्धांचे प्रेरणास्रोत अनागारिक धम्मपाल

> बुद्ध महोत्सव...

बौद्धांचे प्रेरणास्रोत अनागारिक धम्मपाल

रत्नावली व्याख्यान : भंते रेवत महास्थवीर
नागपूर :
आधुनिक बुद्ध धम्माची सखोल असलेली पाळेमुळे खोदून त्याला पुनरुज्जीवित करण्याचे अत्यंत कठीण असे काम अनागारिक धम्मपाल यांनी केले आहे. भारतातील बुद्धांना पुनरुज्जीवित करण्याच्या त्यांच्या योगदानामुळे समस्त बौद्धांचे ते प्रेरणास्रोत मानले जातात, असे प्रतिपादन सारनाथ वाराणसी येथील भंते रेवत महास्थवीर यांनी केले.
दीक्षाभूमीवर सुरू असलेल्या बुद्ध महोत्सवांतर्गत रत्नावली व्याख्यानमालेत गुरुवारी त्यांनी पुष्प गुंफले. अनागारिक धम्मपाल यांच्या जीवनावर प्रकाश टाकतांना भंते रेवत महास्थवीर म्हणाले, भारत हा बुद्ध धम्माची जन्मभूमी आहे. परंतु काही अपप्रवृत्तींच्या आक्रमणामुळे बुद्धधम्म या देशातून हद्दपार झाला. नष्ट झाला. अनागारिक धम्मपाल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अत्यंत कठीण परिश्रमातून भारत जगात पुन्हा बुद्धाचा देश म्हणून ओळखल्या जाऊ लागला. भारताबद्दल जगभरातील बौद्ध राष्ट्रांमध्ये आदर निर्माण झाला. बौद्ध धम्माच्या पुनरुज्जीवनामुळे विषमतेने ग्रासलेल्या भारतीय जनतेला नवजीवन मिळाले. म्हणून भारतीय समाजव्यवस्था समतेकडे वाटचाल करीत आहे.
अनागारिक धम्मपाल यांचा जन्म श्रीलंकेत एका श्रीमंत बौद्ध कुटुंबात झाला. त्यांच्या बालपणी श्रीलंकेत बौद्ध धम्माचे शिक्षण देणाऱ्या संस्था नव्हत्या. त्यामुळे त्यांना ख्रिश्चन मिशनरी शाळेत शिक्षण घ्यावे लागले. नंतर युवा अवस्थेमध्ये त्यांच्या मनात बुद्ध धम्माचे जगात अपूर्ण राहिलेले कार्य करण्याची अभिलाषा निर्माण झाली आणि ते भारतात आले. भारतात बुद्ध धम्माची अधोगती पाहून त्यांना अतीव दु:ख झाले. महाबोधी महाविहार मुक्ती आणि भारतातील बुद्ध धम्माचे पुनरुज्जीवन करण्याचे त्यांनी ठरविले. अत्यंत हालअपेष्टा सहन केल्या. जीवाची पर्वा न करता त्यांनी आंदोलन केले. महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी महाबोधी सोसायटीची स्थापना करून जगातील बौद्ध राष्ट्रांना आवाहन केले. त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. १८९३ च्या शिकागो येथील धर्मपरिषद अनागारिक धम्मपाल यांनी गाजवली होती. भारतात त्याबद्दल फारसे सांगितले जात नसले तरी जगभराने ते मान्य केले आहे. शिकागो धर्मपरिषदेमध्ये अनागारिक धम्मपाल हे स्वामी विवेकानंद यांना सोबत घेऊन गेले होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
संचालन धम्मचारी रत्नदर्शी यांनी केले. धम्मचारी नागमित्र यांनी परिचय करून दिला.

Web Title: Anagara Dhammapal of Buddhist inspiration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.