बेळगाव : महिला आणि बालकल्याण विभाग मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याने कर्नाटक विधान परिषद सदस्य आणि भाजप नेते सी. टी. रवी यांना गुरुवारी अटक करण्यात आली. रवी यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे काँग्रेस आणि भाजप यांच्यात तणाव निर्माण झाला असून, त्यानंतर विधान परिषदेत मोठा गदारोळ झाला.केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या विधानावरून झालेल्या प्रचंड गदारोळानंतर सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. त्यानंतर सभागृहाबाहेर सी. टी. रवी यांनी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याविषयी आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला.
काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शनेमंत्री हेब्बाळकर समर्थकांना ही बाब समजताच त्यांनी विधानसौध परिसरात घुसण्याचा प्रयत्न करून जोरदार निदर्शने सुरू केली. अनेक समर्थक विरोध प्रदर्शनासाठी रस्त्यावर उतरले. सी. टी. रवी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या अटकेची मागणी हे समर्थक करत होते. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सी. टी. रवी यांना घेराव घालण्याचाही प्रयत्न केला.
हा तर फौजदारी गुन्हा : मुख्यमंत्रीमुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, सी. टी. रवी यांनी लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याविरोधात वापरलेला ‘शब्द’ फौजदारी गुन्हा मानला जातो तसेच हेब्बाळकर यांनी सी. टी. रवी यांच्याविरूद्ध तातडीने पोलिसांत तसेच सभापतींकडे तक्रार दाखल केली असून, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
माझ्या बोलण्याचा विपर्यास : सी. टी. रवीमी कुणालाही अपशब्द वापरला नाही, गरज पडल्यास कामकाजादरम्यानचे सर्व ऑडिओ आणि व्हिडीओ पडताळून पाहू शकता, मी घाबरणारा राजकारणी नाही. माझ्या बोलण्याचा विपर्यास केला गेला, असे सी. टी. रवी यांनी सांगितले.
सी. टी. रवी यांचे धरणेसुवर्णसौधच्या पहिल्या मजल्याबाहेर सी. टी. रवी यांनी धरणे धरले. यावेळी भाजप नेत्यांनी पोलिसांवर टीका केली. विधानसभा परिसरात गुंड घुसल्याच्या आरोप भाजप नेत्यांनी केला. काँग्रेस कार्यकर्ते, नेते आणि हेब्बाळकर समर्थकांच्या गोंधळानंतर हिरेबागेवाडी पोलिस ठाण्यात सी. टी. रवी यांच्या विरोधात भादंवि संहितेच्या कलमांन्वये कायदा क्रमांक ७५ आणि ७९ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली.